चेंबूर येथे सुरु असलेल्या जुगार क्लबवर गुन्हे शाखेचा छापा
33 जणांवर कारवाई तर 3.31 कोटीचा मुद्देमाल जप्त
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
4 ऑक्टोंबर 2025
मुंबई, – चेंबूर येथील एका निवासी फ्लॅटमध्ये सुरु असलेल्या जुगार क्लबचा गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी पर्दाफाश केला. या कारवाईत पोलिसांनी 33 जणांना ताब्यात घेतले आहे. त्यात क्लबच्या चालकासह एक कॅशिअर, सात जुगार खेळविणारे आणि चौवीस खेळाडू आदींचा समावेश आहे. घटनास्थळाहून पोलिसांनी 3 कोटी 31 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या गुन्ह्यांचा तपास गुन्हे शाखा युनिट आठकडे सोपविण्यात आला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक संग्राम पाटील तपास करत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
चेंबूर परिसरातील एका निवासी इमारतीमध्ये जुगार क्लब सुरु असून या क्लबमध्ये रात्री उशिरापर्यंत लाखो रुपयांचा जुगार खेळला जात असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अधिकार्यांना मिळाली होती. त्याची पोलीस आयुक्त देवेन भारती सहपोलीस आयुक्त लखमी गौतम, अतिरिक्त पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त विशाल ठाकूर यांनी गंभीर दखल घेत गुन्हे शाखेला कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
या आदेशांनतर सहाय्यक पोलीस आयुक्त किशोर शिंदे, प्रशांत राजे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेगारी गुन्हेवार्ता पथकाचे प्रभारी पोलीस निरीक्षक काठे पोलीस निरीक्षक लोणकर, महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक निकम, पोलीस उपनिरीक्षक साबळे, कुरेशी, पोलीस हवालदार पाटील, बंगाले,चौधरी, पोलीस शिपाई उथळे, गायकर, विशेष कार्य पथकाचे पोलीस हवालदार चौधरी, पोलीस शिपाई रोझ, उत्तेकर, राठोड, युनिट आठचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संग्राम पाटील, पोलीस हवालदार कांबळे, यादव, काकडे, पाटील, बाराहाते, सकट, पोलीस शिपाई सटाले, काकड, अतिग्रे, महिला पोलीस शिपाई मोरे, गायकवाड, पोलीस शिपाई डवंग आदींनी शुक्रवारी रात्री चेंबूर येथील वसंत विहार कमर्शियल कॉम्प्लेक्सच्या तिसर्या मजल्यावरील फ्लॅट क्रमांक 306 आणि 307 मध्ये एकाच वेळेस छापा टाकला होता.
या छाप्यादरम्यान पोलिसांनी एकूण 33 जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यात जुगार क्लब चालविणारा चालक, एक कॅशिअर, सात जुगार खेळविणारे तसेच 24 खेळांडूचा समावेश होता. घटनास्थळाहून पोलिसांनी दिड लाखांची कॅश, 3 कोटी 30 लाख 1 हजार 400 रुपयांचे जुगाराचे साहित्य, पाच हजाराची आर्थिक व्यवहारासाठी ठेवलेले पीओएस मशिन,दहा हजाराचे विदेशी मद्य असा 3 कोटी 31 लाख 66 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या आरोपीविरुद्ध आरसीएफ पोलीस ठाण्यात भारतीय न्याय सहिता, महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम, महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम कायदा कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यांचा तपास नंतर गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.