बाईकवरुन आलेल्या दोन मारेकर्याकडून बिल्डरवर गोळीबार
आर्थिक वाद किंवा पूर्ववैमस्नातून गोळीबार झाल्याचा अंदाज
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
9 एप्रिल 2025
मुंबई, – बाईकवरुन आलेल्या दोन अज्ञात मारेकर्यांनी एका बिल्डरवर गोळीबार केला. या गोळीबारात सद्दुउद्दीन खान ऊर्फ सदरु (50) हे जखमी झाले असून त्यांच्यावर जवळच्या झेन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहे. अचानक झालेल्या या गोळीबाराच्या घटनेने परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याप्रकरणी चेंबूर पोलिसांनी हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा नोंदवून पळून गेलेल्या दोन्ही मारेकर्यांचा शोध सुरु केला आहे. स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी मारेकर्यांच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. आर्थिक वाद किंवा पूर्ववैमस्नातून हा गोळीबार झाला असावा असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
ही घटना बुधवारी 9 एप्रिलला रात्री पावणेदहा वाजता चेंबूर येथील डायमंड गार्डनजवळील सिग्नलजवळ घडली. सद्दुउद्दीन खान हे हे नवी मुंबईतील बिल्डर असून सध्या ते त्यांच्या कुटुंबियांसोबत नवी मुंबईतील बेलापूर परिसरात राहतात. बुधवारी रात्री उशिरा ते त्यांच्या खाजगी कारने नवी मुंबईच्या दिशेने जात होते. डायमंड गार्डनजवळ सिग्नलजवळ येताच बाईकवरुन आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या कारच्या दिशेने गोळीबार केला होता. दोन ते तीन गोळ्या फायर गेल्याने त्यातील एक गोळी त्यांच्या हाताला चाटून गेली. गोळीबारानंतर दोन्ही मारेकरी बाईकवरुन पळून गेले होते. अचानक झालेल्या गोळीबाराच्या घटनेने परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
ही माहिती प्राप्त होताच स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. जखमी झालेल्या सद्दुउद्दीन खान यांना पोलिसांनी तातडीने जवळच्या झेन हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तिथे त्यांच्यावर उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. ही माहिती नंतर त्यांच्या कुटुंबियांना देण्यात आली होती. याप्रकणी त्यांची पोलिसांकडून चौकशी करण्यात आली असून या चौकशीतून काही गोष्टींचा खुलासा करण्यात पोलिसांना यश आले आहे.
परिसरातील सीसीटिव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून या फुटेजवरुन पळून गेलेल्या दोन्ही मारेकर्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. या गोळीबारामागील कारणाचा खुलासा होऊ शकला नाही. मात्र आर्थिक वादातून किंवा पूर्ववैमस्नातून हा हल्ला झाला असावा असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहेत.