लग्नासाठी बुक केलेल्या फ्लॅट खरेदी व्यवहारात 70 लाखांची फसवणुक
चेंबूरच्या सराईत मायलेकाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
6 ऑक्टोंबर 2025
मुंबई, – लग्नानंतर कुटुंबियांसाठी मोठ्या फ्लॅटची गरज असल्याने चेंबूर परिसरातील एका फ्लॅटच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारात एका व्यक्तीची मायलेकांनी सुमारे 70 लाखांची फसवणुक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सुधीर किशोर मसांद आणि रश्मी किशोर मसांद या आरोपी मायलेकाविरुद्ध चुन्नाभट्टी पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या दोघांविरुद्ध चेंबूर आणि आंबोली पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल असून त्यांनी कर्ज घेऊन काही बँकांचीही फसवणुक केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. फसवणुकीच्या गुन्ह्यांत न्यायालयीन कोठडीत असलेल्या सुधीर आणि रश्मी यांची लवकरच चुन्नाभट्टी पोलिसांकडून ताबा घेतला जाणार आहे.
राज हरिश आयदासानी हे त्यांच्या आई-वडिल, बहिणीसोबत चेंबूर परिसरात राहतात. ते एका खाजगी कंपनीत कामाला आहे तर त्यांच्या वडिलांचा स्वतचा व्यवसाय आहे. डिसेंबर 2024 रोजी त्यांना लग्न करायचे होते, त्यामुळे त्यांच्या वडिलांनी त्यांच्यासाठी एक फ्लॅट खरेदी करण्यासाठी काही ब्रोकरशी संपर्क साधला होता. या ब्रोकरने त्यांना चेंबूर येथील काही फ्लॅट दाखविले होते. या फ्लॅटचे झेरॉक्स प्रत त्यांना देण्यात आले होते. फ्लॅटच्या कागदपत्रांची त्यांनी त्याचंया वकिलांच्या मदतीने शहानिशा केली होती. यावेळी वकिलाने फ्लॅटचे दस्तावेज बरोबर असल्याचे सांगितले होते. त्यानंतर त्यांनी सुधीर व त्यांची आई रश्मी यांचा चेंबूरमधील फ्लॅट खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता.
चर्चेअंती त्यांच्यात फ्लॅटच्या खरेदी-विक्रीचा व्यवहार 1 कोटी 51 लाखांमध्ये पक्का झाला होता. त्यामुळे त्यांनी त्यांना टप्याटप्याने सत्तर लाख रुपये दिले होते. तसेच त्यांच्याकडे फ्लॅटचे मूळ दस्तावेजाची मागणी केली होती. यावेळी त्यांनी फ्लॅटचे दस्तावेज रजिस्ट्रेशन करताना देण्याचे आश्वासन दिले होते. याच दरम्यान त्यांनी 80 लाखांच्या गृहकर्जासाठी अर्ज केला होता. रजिस्ट्रेशननंतर त्यांच्या बँक खात्यात गृहकर्जाची रक्कम ट्रान्स्फर होणार होती. त्यापूर्वी त्यांनी 29 एप्रिल 2025 रोजी अक्षय तृतीयाच्या पार्श्वभूमीवर गृहप्रवेश करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र वांरवार कॉल करुनही सुधीर त्यांचे कॉल घेत नव्हता.
चौकशीदरम्यान सुधीर हा त्याची आई रश्मीसोबत दिल्लीला गेल्याचे समजले. 15 मेपर्यंत ते दोघेही दिल्लीहून मुंबईत येणार होते. मात्र मे महिना उलटूनही ते दोघेही मुंबईत आले नाही. याच दरम्यान राज आयदासानी यांना सुधीर आणि रश्मी मसांद यांच्याविरुद्ध चेंबूर आणि आंबोली पोलीस ठाण्यात फ्लॅटचा व्यवहार करुन संबंधित व्यक्तीची फसवणुक केल्याप्रकरणी दोन गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळाली होती. याच गुन्ह्यांत त्यांना पोलिसांनी अटक केली असून सध्या ते दोघेही न्यायालयीन कोठडीत आहेत. इतकेच नव्हे तर त्यांनी याच फ्लॅटवर कर्ज काढून काही बँकांची फसवणुक केल्याचे समजले होते.
ही माहिती समजल्यानंतर त्यांना धक्काच बसला होता. या दोघांनी फ्लॅटच्या खरेदी-विक्रीचा व्यवहार करुन त्यांची सुमारे 70 लाखांची फसवणुक केली होती. त्यामुळे घडलेला प्रकार त्यांनी चुन्नाभट्टी पोलिसांना सांगून त्यांच्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यांनतर सुधीर मसांद आणि त्याची आई रश्मी मसांद यांच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. याच गुन्ह्यांत न्यायालयीन कोठडीत असलेल्या दोन्ही मायलेकांची पोलिसांकडून ताबा घेतला जाणार आहे. या दोघांनी अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केले आहे का याचा तपास सुरु आहे.