दहा वर्षांच्या अल्पवयीन मुलीला घरी आणून लैगिंक अत्याचार
दोन्ही मुलांविरुद्ध गुन्हा दाखल; बालसुधारगृहात रवानगी
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१६ मे २०२४
मुंबई, – मैत्रिणीसोबत खेळण्यासाठी गेलेल्या एका दहा वर्षांच्या अल्पवयीन मुलींवर सामूहिक लैगिंक अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार चेंबूर परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी चौदा आणि पंधरा वयोगटातील दोन्ही अल्पवयीन मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून याच गुन्ह्यांत दोन्ही आरोपींना डोंगरीतील बालसुधारगृहात पाठविण्यात आले आहे. त्यांच्याविरुद्ध लैगिंक अत्याचारासह पोक्सोच्या विविध कलमांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या दोघांनी पिडीत मुलीला घरी आणून तिच्यावर पोटमाळ्यावर आळीपाळीने सामूहिक अत्याचार केल्याचे तपासात उघडकीस आले. तिच्यावर राजावाडी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असून तिथेच तिची मेडीकल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
१० वर्षांची पिडीत मुलगी ही चेंबूर परिसरात राहते. याच परिसरात दोन्ही आरोपी मुले राहत असल्याने ते एकमेकांच्या परिचित आहेत. मंगळवारी ही मुलगी नेहमीप्रमाणे घराजवळच तिच्या मैत्रिणीसोबत खेळण्यासाठी गेली होती. खेळून झाल्यानंतर ती रात्री घरी जाण्यासाठी निघाली. यावेळी तिला चौदा आणि पंधरा वयोगटातील या दोन्ही मुलांनी पकडून त्यांच्या घरी आणले. त्यानंतर त्यांनी तिच्यावर घरातील पोटमाळ्यावर आळीपाळीने लैगिंक अत्याचार केला होता. तिने आरडाओरड करु नये म्हणून त्यांनी तिचे तोंड दाबले होते. हा प्रकार कोणालाही सांगू नकोस अशी धमकी दिल्यानंतर त्यांनी तिची सुटका केली. घरी आल्यानंतर तिने हा प्रकार तिच्या बहिणीला सांगितला. तिच्याकडून ही माहिती ऐकून तिला प्रचंड मानसिक धक्का बसला होता. त्यानंतर ते दोघेही चेंबूर पोलीस ठाण्यात आले आणि त्यांनी घडलेला प्रकार तिथे उपस्थित पोलिसांना सांगितले.
पिडीत मुलीच्या बहिणीच्या तक्रारीवरुन पोलिसांनी दोन्ही आरोपीविरुद्ध सामूहिक लैगिंक अत्याचारासह पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच या दोघांनाही पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी पिडीत मुलीवर अत्याचार केल्याची कबुली दिली. दोन्ही मुले अल्पवयीन असल्याने त्यांना नंतर डोंगरीतील बालसुधारगृहात पाठविण्यात आले होते. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून लवकरच दोन्ही आरोपींची वैद्यकीय तपासणी होणार आहे. दरम्यान पिडीत मुलीला राजावाडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून तिथेच तिची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. त्याचा अहवाल लवकरच पोलिसांना प्राप्त होणार आहे.