छेड काढून पत्नीविषयी अपशब्द काढण्याचा जाब विचारणे जिवावर बेतले
दारुच्या नशेत मित्रानेच मित्राची मासे कापण्याच्या सुर्याने हत्या केली
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
८ मार्च २०२४
मुंबई, – छेड काढून पत्नीविषयी अपशब्द काढण्याचा जाब विचारणे एका ३४ वर्षांच्या मित्राच्या जिवावर बेतल्याची धक्कादायक घटना चेंबूर परिसरात उघडकीस आली आहे. याच कारणावरुन झालेल्या वादातून भिमसेन देवचंद्र भालेराव याची त्याच्याच मित्राने मासे कापण्याच्या सुर्याने भोसकून निर्घृण हत्या केली. याप्रकरणी हत्येचा गुन्हा नोंद होताच पळून गेलेल्या रोहित दिपक खर्पे या आरोपी मित्राला अवघ्या चार तासांत टिळकनगर पोलिसांनी अटक केली. त्याच्या चौकशीतून हा प्रकार उघडकीस आल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिपक बागुल यांनी सांगितले.
भिमसेन हा त्याच्या पत्नीसह नवी मुंबईतील जुईनगर परिसरात राहतो. तो पूर्वी चेंबूर येथील पी. एल लोखंडे मार्गावर राहत होता. तिथेच तो लहानाचा मोठा झाला होता. याच परिसरात रोहित राहत असल्याने ते दोघेही एकमेकांच्या परिचित होते. बालपणीचे मित्र होते. लग्नानंतर भिमसेन हा चेंबूर सोडून जुईनगर गेला होता. मात्र तो अधूनमधून तिथे येत होता. अनेकदा रोहित हा त्याच्या पत्नीची छेड काढून तिच्याविषयी अपशब्द काढून भिमसेनला भडकाविण्याचा प्रयत्न करत होता. त्यातून त्यांच्यात अनेकदा खटके उडाले होते. गुरुवारी रात्री उशिरा ते दोघेही परिसरात मद्यप्राशन करण्यासाठी बसले होते. पहाटे चार वाजता त्यांच्यात पुन्हा वाद झाला आणि दारुच्या नशेत रोहितने भिमसेनची मासे कापण्याच्या सुर्याने वार करुन हत्या केली होती. या हत्येनंतर तो पळून गेला होता. सकाळी हा प्रकार उघडकीस येताच स्थानिक रहिवाशांनी टिळकनगर पोलिसांना ही माहिती दिली.
या माहितीनंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिपक बागुल यांच्यासह त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली होती. जखमी झालेल्या भिमसेनला पोलिसांनी तातडीने जवळच्या शासकीय हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. या घटनेनंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध हत्येचा गुन्हा नोंदवून तपासाला सुरुवात केली होती. या घटनेची अतिरिक्त पोलीस आयुक्त विनायक देशमुख, पोलीस उपायुक्त हेमराजसिंह राजपूत यांनी गंभीर दखल घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिपक बागुल यांना तपास करुन मारेकर्याच्या अटकेसाठी विशेष मोहीम सुरु करण्याचे आदेश दिले होते. या आदेशानंतर पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे, दत्तात्रय पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघमारे, पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार, विजयसिंह देशमुख, आत्माराम राठोड, शिवाजी काकडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पौर्णिमा हांडे, पल्लवी शिसोदे, पोलीस हवालदार सुनिल पाटील, संजय शिंदे, संदीप गर्जे, सत्यवान साठेलकर, सोमनाथ पोमणे, पोलीस शिपाई रोहित फरांदे, समीर पिंजारी, गणेश गायकवाड, भारत नागरगोजे, दर्शन कोकाटे, मनोज कडव, उमेश कटके यांचे सहा विशेष पथक तयार करुन तपास सुरु करण्यात आला होता.
गुप्त बातमीदारांकडून तसेच तांत्रिक माहितीवरुन पोलिसांनी रोहित खर्पे याला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत तो आणि मृत भिमसेन हे दोघेही रात्री उशिरापर्यंत मद्यप्राशन करत होते. मद्यप्राशन करताना रोहितने पुन्हा भिमसेनच्या पत्नीविषयी अपशब्द बोलला होता. त्यातून त्यांच्यात पुन्हा शाब्दिक बाचाबाची झाली होती. त्यातून त्याने भिमसेनची हत्या केल्याची कबुली दिली. या हत्येनंतर तो प्रचंड घाबरला आणि तेथून पळून गेला होता. मात्र हत्येचा गुन्हा नोंद होताच अवघ्या चार तासांत वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिपक बागुल व त्यांच्या पथकाने आरोपी मित्राला शिताफीने अटक केली. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.