मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
15 एप्रिल 2025
मुंबई, – भांडणात डोक्यात बाटली मारली म्हणून रागाच्या भरात मोहम्मद फरीद आलिम शेख या 20 वर्षांच्या तरुणाची त्याच्याच परिचित आरोपी तरुणाने चाकूने भोसकून हत्या केल्याची घटना चेंबूर परिसरात घडली. याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल होताच वैभव पांडुरंग भिंगारदिवे या 21 वर्षांच्या आरोपी तरुणाला चेंबूर पोलिसांनी अटक केली. हत्येच्या याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ही घटना सोमवारी रात्री उशिरा दिड वाजता चेंबूर येथील चेंबूर कॅम्प, लालमिट्टी गार्डनजवळील गल्लीत घडली. मोहम्मद अरमान मोहम्मद अलीम शेख हा तरुण रिक्षाचालक असून तो त्याच्या कुटुंबियांसोबत गोवंडीतील शिवाजीनगर, मोहम्मद रफिक नगरात राहतो. मृत मोहम्मद फरीद हा त्याचा लहान भाऊ असून तो सध्या काहीच कामधंदा करत नव्हता. आरोपी वैभव हा त्यांच्या परिचित असून काही दिवसांपूर्वी वैभव आणि मोहम्मद फरीद यांच्यात क्षुल्लक कारणावरुन वाद झाला होता. सोमवारी रात्री उशिरा ते दोघेही लालमिट्टी गार्डनजवळील गल्लीत भेटले होते. यावेळी त्यांच्यात पुन्हा वाद झाला होता.
या वादानंतर मोहम्मद फरीदने वैभवच्या डोक्यात बाटलीने मारहाण केली होती. त्यानंतर त्याने त्याच्यावर चाकूने प्राणघातक हल्ला केला होता. त्यात मोहम्मद फरीद हा गंभीररीत्या जखमी झाला होता. त्यामुळे त्याला तातडीने जवळच्या शासकीय हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. ही माहिती मिळताच चेंबूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी मोहम्मद अरमान याच्या तक्रारीवरुन वैभव भिंगारदिवे याच्याविरुद्ध पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या वैभवला काही तासांत पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून गुन्ह्यांतील चाकू पोलिसांनी जप्त केला आहे.