बहिणीची बदनामी करतो म्हणून तरुणाची हत्या

हत्येच्या गुन्ह्यांत आरोपीस अटक व कोठडी

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
23 फेब्रुवारी 2026
मुंबई, – बहिणीची बदनामी करतो म्हणून छोटू ऊर्फ रोहित राजनाथ विश्वकर्मा या 31 वर्षांच्या तरुणाची त्याच्याच परिचित आरोपीने चाकूने छातीत भोसकून हत्या केल्याची घटना चेंबूर परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या प्रदीप गौडा या आरोपीस काही तासांत आरसीएफ पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत आहे. ही घटना रात्री सव्वाअकरा वाजता चेंबूर येथील रामटेकडी गार्डनजवळ घडली.

अनिल राजनाथ विश्वकर्मा हा चेंबूर येथे त्याची आई अमलादेवी, भाऊ अशोक आणि रोहित यांच्यासोबत चेंबूर परिसरात रहातो. तो रोहितसोबत वेल्डिंगचे काम करतो. त्यांचा मोठा भाऊ अशोकला मानसिक आजार असल्याने त्याची आई त्याला घेऊन त्यांच्या उत्तरप्रदेशातील बरहज, तिवारीपुर गावी गेली होती. त्यामुळे तो त्याचा भाऊ रोहितसोबत घरी राहत होता. शनिवारी काही काम नसल्याने ते दोघेही घरी होते. दुपारी तीन वाजता रोहित काम असल्याने बाहेर निघून गेला होता. रात्री नऊ वाजता रोहित त्याला रामटेकडी गार्डनजवळ दिसला होता. रात्री साडेदहा वाजता त्याने रोहितला कॉल करुन कधीपर्यंत घरी येणार आहेस याबाबत विचारणा केली. यावेळी त्याने थोड्या वेळाने येतो असे सांगितले.

रात्री उशिरा त्याच्या आईच्या मैत्रिणीने त्याला कॉल आला होता. तिने रोहितला प्रदीपने चाकूने भोसकले असून तो गंभीररीत्या जखमी झाला होता. त्यामुळे त्याला सायन हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आहे. या माहितीनंतर अनिल हा सायन हॉस्पिटलमध्ये गेला होता. तिथे गेल्यानंतर त्याला रोहितवर अतिदक्षता विभागात उपचार सुरु असून त्याची प्रकृती गंभीर आहे. प्रदीपने त्याच्यावर चाकूने वार केला होता, त्यात त्याच्या छातीला गंभीर दुखापत झाली होती. ही माहिती मिळताच आरसीएफ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. तपासात प्रदीप हा याच परिसरात राहत असून त्याला तीन बहिणी आहेत.

सहा महिन्यापूर्वी रोहितने प्रदीपला त्याची बहिण कोणासोबत फिरत असल्याची माहिती दिली होती. तो मित्रांसोबत त्याच्या बहिणीची बदनामी करत असल्याने त्यांच्यात प्रचंड वाद झाला होता. याच वादातून त्याने रोहितला शिवीगाळ करुन बेदम मारहाण केली होती. तसेच त्याच्या बहिणीची पुन्हा बदनामी केल्यास रोहितला जिवे मारण्याची धमकी दिली होती. शनिवारी रात्री उशिरा याच कारणावरुन त्यांच्यात वाद झाला होता. त्यातून रागाच्या भरात त्याने रोहितवर चाकूने छातीत वार केले होते.

याच दरम्यान उपचारादरम्यान रोहितचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी अनिल विश्वकर्मा याच्या तक्रारीवरुन पोलिसांनी प्रदीप गौडा याच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही शोधमोहीम सुरु असताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय पाटील यांच्या पथकाने काही तासांत प्रदीपला अटक केली. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page