अल्पवयीन मुलीवर मावस बहिणीच्या पतीकडून लैगिंक अत्याचार
झोपेच्या गोळ्या देऊन अत्याचार केल्याचे उघड; आरोपीस अटक
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२२ ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – चेंबूर येथे एका अल्पवयीन मुलीवर तिच्याच मावस बहिणीच्या पतीने झोपेच्या गोळ्या देऊन लैगिंक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी चेंबूर पोलिसांनी भादवीसह पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदवून मावस बहिणीच्या पतीला अटक केली असून याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत आहे. पिडीत मुलीने एका मुलाला जन्म दिला आहे. दोन दिवसांपूर्वी हा प्रकार उघडकीस आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
पिडीत मुलगी मूळची उत्तरप्रदेशची रहिवाशी असून तिची मावस बहिण ही चेंबूर परिसरात राहते. गेल्या एक वर्षांपासून ती तिच्यासोबत तिच्या घरी राहत आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यांत ती घरी असताना तिच्या मावस बहिणीच्या आरोपी पतीने तिला झोपेच्या गोळ्या दिल्या होत्या. त्यानंतर त्याने तिच्यावर झोपेतच लैगिंक अत्याचार केला होता. हा प्रकार नंतर तिच्या लक्षात येताच त्याने तिला शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिली होती. या संबंधातून ती गरोदर राहिली आणि तिने एका मुलाला जन्म दिला होता. हा प्रकार २१ ऑक्टोंबरला उघडकीस येताच चेंबूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पिडीत मुलीची जबानी नोंदवून घेतली होती. यावेळी तिने घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला होता. तिच्या जबानीनंतर चेंबूर पोलिसांनी मावस बहिणीच्या पतीविरुद्ध लैगिंक अत्याचारासह शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी देणे आणि पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच सोमवारी आरोपीस पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला मंगळवारी विशेष पोक्सो कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याची लवकरच पोलिसांकडून मेडीकल केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.