दहा वर्षांनी यश क्लिनिकच्या वरिष्ठ डॉक्टराविरुद्ध गुन्हा दाखल
उपचारात हलगर्जीपणा करुन मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा आरोप
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
४ जानेवारी २०२४
मुंबई, – थंडीतापाच्या उपचारासाठी आलेल्या शशिकांत तुकाराम जगताप या ५५ वर्षांच्या रुग्णाला डायनापार नावाचे इंजेक्शन देऊन उपचारात हलगर्जीपणा करुन त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी चेंबूरच्या यश क्लिनिकचे वरिष्ठ डॉक्टर विजय दत्तात्रय घुटुगडे यांच्याविरुद्ध चेंबूर पोलिसांनी हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल केला आहे. शशिकांतच्या मृत्यूचा कालिना प्रयोगशाळा तसेच जे. जे हॉस्पिटलकडून आलेल्या अहवालानंतर तब्बल दहा वर्षांनी गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. याच गुन्ह्यांत विजय घुटुगडे यांची लवकरच पोलिसांनी चौकशी करुन जबानी नोंदविली जाणार आहे.
जयवंत तुकाराम जगताप हे ६४ वर्षांचे वयोवृद्ध चेंबूर येथील आर. सी मार्ग, बसंत पार्क, गावदेवी कंपाऊंडच्या मारवाडीत राहतात. शशिकांत (५५) हा त्यांचा लहान भाऊ आहे. ७ ऑक्टोंबर २०१४ रोजी त्याला थंडीताप असल्याने त्यांचा भाचा महेश मोरेश्वर कदम यांनी डॉ. विजय घुटुगडे यांच्या विजयनगररातील नवजीवन सोसायटीच्या यश क्लिनिकमध्ये दाखल केले होते. यावेळी डॉक्टरांनी त्याला तपासून त्याच्या कंबरेला एक इंजेक्शन दिले होते. तसेच त्याला काही औषध दिले होते. दुसर्या दिवशी त्यांना रक्त तपासणीसाठी पाठविण्यात ाअले होते. मात्र इंजेक्शन दिल्यानंतर शशिकांतच्या कंबरेत प्रचंड वेदना होऊ लागल्या. त्यांच्या कंबरेला सुज आली होती. त्यामुळे ते पुन्हा विजय घुटुगडे यांच्याकडे गेले होते. त्यांनी त्यांना पुढील उपचारासाठी सायन हॉस्पिटलमध्ये पाठविले होते. तिथे उपचार करताना डॉक्टरांनी त्यांना इंजेक्शनमुळे त्यांना गॅगरिन झाल्याचे सांगून त्यांच्यावर तातडीने ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर त्यांच्यावर ऑपरेशन करुन उजव्या पायाच्या कंबरेपासून गुडघ्यापर्यंतचे मांस कापण्यात आले होते.
१० ऑक्टोंबर २०१४ रोजी उपचारादरम्यान शशिकांत जगता यांचा सायंकाळी मृत्यू झाला होता. या घटनेनंतर जयवंत जगताप यांच्या तक्रारीवरुन चेंबूर पोलिसांनी एडीआरची नोंद केली होती. त्यानंतर शशिकांतचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला तर त्यांच्या रक्ताचे नमूने कालिना प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल अलीकडेच चेंबूर पोलिसांना प्राप्त झाला आहे. त्यात शशिकांत जगताप यांच्यावर उपचार करताना डॉ. विजय घुटुगडे यांनी हलगर्जीपणा केल्याचे नमूद करण्यात आले होते. त्यांच्यावर डायनापार इंजेक्शनची आवश्यकता नसताना त्यांना ते इंजेक्शन देण्यात आले होते. उपचारात झालेल्या हलगर्जीपणामुळे त्यांना त्यांचा जीव गमवावा लागला होता. दहा वर्षांनी जे. जे. हॉस्पिटलसह कालिना प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त होताच पोलिसांच्या वतीने पोलीस शिपाई हर्षा दादा जाधव यांच्या तक्रारीवरुन विजय घुटुगडे यांच्याविरुद्ध पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून याच गुन्ह्यांत त्यांची लवकरच पोलिसांकडून चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार आहे.