अनैतिक संबंधाच्या संशयावरुन 43 वर्षांच्या व्यक्तीवर हल्ला
हत्येच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यांत आरोपीस अटक व कोठडी
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
20 फेब्रुवारी 2025
मुंबई, – अनैतिक संबंधाच्या केवळ संशयावरुन सुक्रांज रामभरोसे कश्यप या 43 वर्षांच्या व्यक्तीवर त्याच्याच शेजारी राहणार्या आरोपीने लोखंडी हातोड्याने प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यांत सुक्रांज हा गंभीररीत्या जखमी झाला असून त्याच्यावर सायन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहे. त्याची प्रकृती गंभीर असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा नोंदवून चेंबूर पोलिसांनी पळून गेलेल्या आरोपीस काही तासांत अटक केली. गौरीशंकर महतम पासवान असे या 45 वर्षीय आरोपीचे नाव असून अटकेनंतर त्याला स्थानिक न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
ही घटना बुधवारी रात्री साडेआठ वाजता चेंबूर येथील स्वामी विवेकानंद डिग्री कॉलेजसमोरील कोकणनगर परिसरात घडली. याच परिसरात 20 वर्षांचा अनिल देव कश्यप हा त्याच्या कुटुंबियांसोबत राहतो. तो सध्या चुन्नाभट्टी येथील एका कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहेत. त्याच्या वडिलांचा भंगार विक्रीचा तर त्याचे काका सुक्रांज हे दिवसभर भंगार गोळा करुन त्यांच्या दुकानात विक्री करत होते. सुक्रांज हादेखील याच परिसरात त्याच्या कुटुंबियांसोब राहत होता. त्याच्याच शेजारी गौरीशंकर हादेखील राहत होता. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात वाद सुरु होता. गौरीशंकरला त्याचे काका सुक्रांज याचे त्याच्या सूनेसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. त्यातून त्यांच्यातील वाद विकोपास गेले होते.
याच कारणावरुन बुधवारी साडेआठ वाजता गौरीशंकर सुक्रांज यांच्या डोक्यात लोखंडी हातोड्याने प्राणघातक हल्ला केला होता. त्यात तो गंभीररीत्या जखमी झाला होता. त्यामुळे सुक्रांजला त्याच्या नातेवाईकांनी तातडीने गोवंडीतील शताब्दी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याच्यावर प्राथमिक औषधोपचार करुन त्याला पुढील उपचारासाठी सायन हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आले होते. तिथे त्याच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु असून त्याची प्रकृती गंभीर आहे. ही माहिती मिळताच चेंबूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.
याप्रकरणी अनिल कश्यप याच्या तक्रारीवरुन पोलिसांनी गौरीशंकर पासवान याच्याविरुद्ध हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या गौरीशंकरला पोलिसांनी चेंबूर येथून अटक केली. अटकेनंतर त्याला गुरुवारी दुपारी लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. तपासात सुक्रांज आणि पासवान हे दोघेही उत्तरप्रदेशातील रहिवाशी असून कोंकणनगर परिसरात राहत होता. गौरीशंकरला सुक्रांज याचे त्याच्या सूनेसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. याच संशयावरुन त्याने त्याच्यावर हा हल्ला केल्याचे उघडकीस आले आहे.