शारीरिक संबंधावरुन झालेल्या भांडणातून पत्नीवर पतीने पेटविले

पत्नीवर उपचार सुरु तर पतीविरुद्ध हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
31 मे 2025
मुंबई, – शारीरिक संबंधावरुन झालेल्या वादातून पत्नीला तिच्याच पतीनेच पेटवून दिल्याची धक्कादायक घटना चेंबूर परिसरात उघडकीस आली आहे. या घटनेत पत्नी गंभीररीत्या भाजली असून तिच्यावर सायन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. याप्रकरणी आरसीएफ पोलिसांनी आरोपी पतीविरुद्ध हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला असून या घटनेनंतर तो पळून गेला आहे. त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. शुक्रवारी घडलेल्या या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली होती.

38 वर्षांची ही महिला तिच्या कुटुंबियांसोबत चेंबूर वाशीनाका परिसरात राहते. ती घरकाम करते तर आरोपी हा तिचा पती आहे. शुक्रवारी दुपारी ती साडेबारा वाजता कामासाठी निघाली होती. यावेळी घरी असलेल्या तिच्या पतीने तिच्याकडे लैगिंक संबंधाची मागणी केली होती. मात्र तिने कामावर जाण्याची घाई असल्याने त्याच्याकडे दुर्लक्ष केले होते. त्याचा त्याला प्रचंड राग आला होता. त्यामुळे त्याने तिला शिवीगाळ करुन तिचे बाहेर अनैतिक संबंध असल्याचा आरोप करुन तिच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली होती.

सतत पतीकडून सुरु असलेल्या मानसिक शोषणाला कंटाळून तिने रागाच्या भरात स्वतच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र काडी न लागल्याने तिच्या पतीने गॅसवर भात शिजत असलेल्या गॅसच्या जाळावर कागद पेटवून तो कागद तिच्या अंगावर लावून पेटवून दिले होते. त्यात ती गंभीररीत्या जखमी झाली होती. हा प्रकार स्थानिक रहिवाशांच्या निदर्शनास येताच त्यांनी महिलेची आग विझविण्याचा प्रयत्न केला होता.

तिला तातडीने स्थानिक रहिवाशांनी सायन येथील लोकमान्य टिळक हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिथे तिच्यावर उपचार सुरु आहेत. ही माहिती मिळताच आरसीएफ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. यावेळी उपचार घेणार्‍या महिलेची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली होती. तिच्या जबानीनंतर तिच्या पतीविरुद्ध पोलिसांनी हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला होता. या घटनेनंतर आरोपी पती घरातून पळून गेला होता, त्यामुळे त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page