मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
19 सप्टेंबर 2025
मुंबई, – आर्थिक वादातून मोठ्या भावावर लहान भावाने गरम पाणी ओतल्याची धक्कादायक घटना चेंबूर परिसरात उघडकीस आली आहे. त्यात राजेश वसंत साटम हे गंभीररीत्या भाजले होते. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच आरोपी भाऊ मंगेश वसंत साटम याला आरसीएफ पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. रुमच्या खरेदी व्यवहारात दोन लाख रुपये अतिरिक्त घेतल्यांनतर या दोन्ही भावांमध्ये काही महिन्यांपासून पैशांवरुन वाद सुरु होता, त्यातून हा प्रकार घडल्याचे पोलिसांनी सांगितले.
ही घटना मंगळवारी 16 सप्टेंबरला सकाळी अकरा वाजता चेंबूर येथील माहुल गाव, शिवाजी चौकाजवळील हुर्सलवाडीच्या चव्हाण हाऊसमध्ये घडली. 51 वर्षांचे राजेश साटम हे चेंबूरच्या माहुल गाव, वासंती-लक्ष्मण निवासमध्ये त्यांची आई सुनंदा हिच्यासोबत राहतात. याच परिसरातील चव्हाण हाऊसमध्ये त्यांचा लहान भाऊ मंगेश हा त्याच्या पत्नी आणि दोन मुलांसोबत राहतो. 2018 साली राजेश हे वडाळा येथे राहत होते. तिथे राहत असताना त्यांनी चेंबूर येथे एक रुम घेतला होता. या रुमचा व्यवहार मंगेशने बिल्डरसोबत केला होता. त्यामुळे त्यांनी त्याला बिल्डरला देण्यासाठी दहा लाख रुपये दिले होते.
ही रक्कम दिल्यानंतर तो फ्लॅट त्यांच्या नावावर झाला होता. त्यानंतर राजेश हे त्यांच्या आईसोबत तिथे राहण्यासाठी आले होते. तिथे राहत असताना त्यांना रुमची किंमत आठ लाख रुपये असल्याचे समजले होते. रुमच्या व्यवहारात मंगेशने त्यांच्याकडून दोन लाख रुपये जास्त घेतले होते. त्यामुळे त्यांनी मंगेशकडे दोन लाखांची मागणी केली होती. मात्र त्याने दहा हजार रुपये परत करुन उर्वरित पैसे देण्यास नकार दिला होता. याच पैशांवरुन गेल्या काही महिन्यांपासून दोन्ही भावांमध्ये प्रचंड वाद सुरु होता.
मंगळवारी 16 सप्टेंबरला सकाळी अकरा वाजता राजेश हे मंगेशच्या घरी पैसे मागण्यासाठी गेले होते. यावेळी मंगेशने पैसे देणार नाही असे सांगून तुला काय करायचे आहे ते कर असे सांगितले. इतकेच नव्हे तर त्याने राजेश यांना शिवीगाळ करुन घरातील चाकूने जिवे मारण्याची धमकी दिली होती. यावेळी गॅसवर त्याने पाणी गरम करण्यासाठी ठेवले होते. तेच गरम पाणी त्यांच्या अंगावर ओतले होते. त्यामुळे राजेश यांच्या उजव्या खांद्याला, छातीला आणि पोटाला गंभीर भाजले होते.
हा प्रकार स्थानिक रहिवाशांच्या निदर्शनास येताच त्यांनी त्यांना तातडीने शताब्दी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिथे प्राथमिक औषधोपचार केल्यानंतर त्यांनी आरसीएफ पोलिसांना घडलेला प्रकार सांगून त्यांचा लहान भाऊ मंगेश साटम याच्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर मंगेशविरुद्ध पोलिसांनी 135, 37 (1), 118 (1), 352 भारतीय न्याय सहिता कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता.
गुन्हा दाखल होताच त्याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. याच गुन्ह्यांत नंतर त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर मंगेशला लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या वृत्ताला पोलिसांनी दुजोरा दिला आहे.