अल्पवयीन मुलींच्या मदतीने चालणार्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
महिलेस अटक तर दोन अल्पवयीन मुलीसह तरुणीची सुटका
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२० एप्रिल २०२४
मुंबई, – अल्पवयीन मुलींच्या मदतीने चालणार्या एका सेक्स रॅकेटचा गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कक्षाच्या अधिकार्यांनी पर्दाफाश केला. याप्रकरणी शबनम ऊर्फ सुजाता हसन शेख या ३६ वर्षांच्या महिलेस पोलिसांनी अटक केली असून तिच्याविरुद्ध भादवीसह पिटा आणि पोक्सोच्या विविध कलमांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. अटकेनंतर तिला चेंबूर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. याच गुन्ह्यांत तिला विशेष पोक्सो कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या कारवाईत पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलीसह एका तरुणीची सुटका केली आहे. या तिघींनाही बाल आणि महिला सुधारगृहात पाठविण्यात आले आहे.
शबनम ऊर्फ सुजाता नावाची एक महिला सेक्स रॅकेट चालवत असून ती ग्राहकांसोबत शारीरिक संबंधासाठी अल्पवयीन मुली पुरवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत प्रभारी पोलीस निरीक्षक अनिता कदम यांना कारवाईचे आदेश दिले होते. या आदेशांनतर पोलिसांनी बोगस ग्राहकाच्या मदतीने शबनमला संपर्क साधून तिच्याकडे काही अल्पवयीन मुलीसह तरुणीची मागणी केली होती. मोबाईलवर सौदा पक्का होताच बोगस ग्राहकाने तिला चेंबूरच्या शीव-ट्रॉम्बे रोडवरील डायमंड गार्डनजवळ बोलाविले होते. ठरल्याप्रमाणे शुक्रवारी शबनम ही दोन अल्पवयीन मुलीसह एका तरुणीला घेऊन तिथे आली होती. यावेळी तिचे बोगस ग्राहकासोबत पैशांची देवाणघेवाण सुरु असताना प्रभारी पोलीस निरीक्षक अनिता कदम, पोलीस शिपाई घाडी, पोलीस हवालदार जेडगुले, महिला पोलीस शिपाई दराडे यांनी तिथे कारवाई करुन शबनम ऊर्फ सुजाता शेख हिला चौकशीसाठी ताब्यात घेतले. तिच्या तावडीतून पोलिसांनी तिन्ही मुलींची सुटका केली.
या तिघींच्या चौकशीतून शबनम ही सेक्स रॅकेट चालवत असून तिच्या सांगण्यावरुन त्या ग्राहकांसोबत शारीरिक संबंधासाठी विविध हॉटेल, लॉज आणि गेस्ट हाऊसमध्ये जात असल्याचे उघडकीस आले. या कबुलीनंतर शबनमला पोलिसांनी अटक केली. तिच्याविरुद्ध भादवीसह पिटा आणि पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच गुन्ह्यांत तिला पुढील चौकशीसाठी चेंबूर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले होते. या कारवाईत पोलिसांनी एक मोबाईल आणि दहा हजाराची कॅश जप्त केली आहे. शबनम सध्या पोलीस कोठडीत असून तिची पोलिसांकडून कसून चौकशी सुरु आहे. सुटका केलेल्या दोन्ही अल्पवयीन मुलींसह तरुणीला मेडीकलनंतर बाल आणि महिला सुधारगृहात पाठविण्यात आले होते.