मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
22 सप्टेंबर 2025
मुंबई, – चेंबूर येथे सुरु असलेल्या दोन सेक्स रॅकेटचा गोवंडी आणि आरसीएफ पोलिसांनी पर्दाफाश केला. या दोन्ही कारवाई पोलिसांनी एक चौदा वर्षांच्या अल्पवयीन मुलीसह तरुणीची सुटका केली असून या दोघींनाही देवनार येथील महिला सुधारगृहात पाठविण्यात आले आहे. याच गुन्ह्यांत एका महिलेसह चौघांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याविरुद्ध दोन स्वतंत्र भारतीय न्याय सहिता, पिटा आणि पोक्सोच्या कलमांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. याच गुन्ह्यांत ते चौघेही सध्या पोलीस कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
चेंबूर येथील युनियन पार्क, ड्रिमलॅड सोसायटी, हॉटेल बारी रेसीडेन्सीजवळ मारिया नावाचे एक स्पा सेंटर आहे. या स्पामध्ये मसाजच्या नावाने तिथे कामाला असलेल्या महिलांना ग्राहकांसोबत वेश्याव्यवसायासाठी प्रवृत्त केले जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीची पोलिसांनी एका बोगस ग्राहकाच्या मदतीने शहानिशा केली होती. त्यात तिथे सेक्स रॅकेट चालत असल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर या पथकाने गुरुवारी 18 सप्टेंबरला रात्री सव्वाआठ वाजता स्पामध्ये कारवाई करुन एका महिलेसह तिघांना अटक केली. यावेळी स्पामध्ये असलेल्या एका तरुणीला पोलिसांनी ताब्यात घेतले. तिच्या जबानीतून तिथे संबंधित आरोपी सेक्स रॅकेट चालवत असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर तिला मेडीकलनंतर महिला सुधारगृहात पाठविण्यात आले. या गुन्ह्यांत स्पाच्या मालकाला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.
दुसर्या कारवाईत एका चौदा वर्षांच्या अल्पवयीन मुलीची आरसीएफ पोलिसांनी सुटका केली. या मुलीला वेश्याव्यवसायास प्रवृत्त केलयाप्रकरणी विकी नावाच्या एका 25 वर्षांच्या आरोपीस पोलिसांनी अटक केली. त्याच्याविरुद्ध भारतीय न्याय सहिता, पिटा आणि पोक्सोच्या विविध कलमांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. याच गुन्ह्यांत त्याला विशेष सेशन कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. विकी हा वेश्यादलाल असून तो ऑनलाईन सेक्स रॅकेट चालवत होता. ग्राहकांच्या मागणीनुसार तो काही तरुणीसह अल्पवयीन मुलींना वेश्याव्यवसायासाठी विविध हॉटेल, लॉज आणि गेस्ट हाऊसमध्ये पाठवत होता. ही माहिती प्राप्त होताच पोलिसांनी बोगस ग्राहकाच्या माध्यमातून शहानिशा केली होती. बुधवारी रात्री नऊ वाजता विकी हा बळीत मुलीला घेऊन चेंबूर येथील एका हॉटेलमध्ये घेऊन आला असता पोलिसांनी ही कारवाई केली. त्याच्या तावडीतून पोलिसांनी चौदा वर्षांच्या मुलीची सुटका करुन तिला देवनार येथील महिला सुधारगृहात पाठविले आहे.