बीएस आयटीच्या २३ वर्षीय विद्यार्थिनीची आत्महत्या

मानसिक नैराश्यातून गळफास घेऊन जीवन संपविले

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१७ ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – वरळीतील एका नामांकित कॉलेजमध्ये बीएस आयटीच्या दुसर्‍या वर्गात शिकणार्‍या दिशा कांबळे नावाच्या एका २३ वर्षांच्या विद्यार्थिनीने चेंबूरच्या वसतीतगृहात आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या आत्महत्येमागील कारणाचा खुलासा होऊ शकला नाही, मात्र मानसिक नैराश्यातून दिशाने गळफास घेऊन जीवन संपविल्याचे बोलले जाते. तिच्या आत्महत्येची माहिती तिच्या पालकांना कळविण्यात आली आहे. त्यांच्या जबानीनंतर या आत्महत्येमागील कारण समजू शकेल असे पोलिसांकडून सांगण्यात आले. याप्रकरणी चेंबूर पोलिसांनी एडीआरची नोंद करुन तपास सुरु केला आहे.

दिशा कांबळे ही मूळची देवगडची रहिवाशी असून ती सध्या वरळीतील ससमिरा इन्स्ट्यिूट कॉमर्स ऍण्ड सायन्स कॉलेजमध्ये बीएस आयटीच्या दुसर्‍या वर्गात शिकत होती. मुंबईत राहण्याची व्यवस्था नसल्याने ती सध्या चेंबूरच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्यक विभागाच्या माता रमाबाई आंबेडकर शासकीय वसतिगृहात राहत होती. तिच्यासोबत तिचे इतर काही मैत्रिणी राहत होत्या. बुधवारी रात्री दिशा ही नेहमीप्रमाणे कॉलेजवरुन वसतिगृहात आली होती. जेवण केल्यानंतर ती काही वेळ मोबाईलवर होती. त्यानंतर ती झोपण्यासाठी तिच्या रुममध्ये गेली होती. काही वेळानंतर तिच्या मैत्रिणीने तिला हाक मारली, मात्र तिने काहीच प्रतिसाद दिला नाही. दरवाजा ठोठावूनही ती काहीच प्रतिसाद देत नव्हती. हा प्रकार संशयास्पद वाटताच त्यांनी वसतीगृहातील अधिकार्‍यांना ही माहिती दिली. त्यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता दिशाने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले. ही माहिती मिळताच चेंबूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. तिला राजावाडी हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता तिथ तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्यानंतर तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला होता.

दिशाकडे पोलिसांना सुसायट नोट सापडली नाही, त्यामुळे तिने आत्महत्या का केली याचा उलघडा होऊ शकला नाही. याबाबत तिच्या पालकांसह मैत्रिणीची पोलिसांकडून जबानी नोंदविण्यात येणार आहे. तिचा मोबाईल पोलिसांनी ताब्यात घेतला असून या मोबाईलमधील माहिती काढण्याचे काम सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान दिशाच्या आत्महत्येने तिच्या मैत्रिणीसह वसतिगृहातील इतर विद्यार्थिनींमध्ये प्रचंड शोककळा पसरली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page