मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
10 सप्टेंबर 2025
मुंबई, – त्वचा रोगतंज्ञ डॉक्टरच्या क्लिनिकमध्ये दहा लाखांची चोरी केल्याचा आरोप असलेल्या दोन्ही नर्स महिलांना चेंबूर पोलिसांनी अटक केली. सरोज कांबळे आणि रुपाली गायकवाड अशी या दोघींची नावे आहेत. चोरीच्या याच गुन्ह्यांत दोघीही सध्या पोलीस कोठडीत असून त्यांच्याकडून चोरीची कॅश लवकरच हस्तगत केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
सौम्या वर्धित हेगडे ही महिला व्यवसायाने डॉक्टर असून विक्रोळी परिसरात राहते. तिचे पती वर्धित हेगडे हे डोळ्यांचे डॉक्टर आहे तर ती स्वत त्वचा रोगतंज्ञ डॉक्टर म्हणून काम करते. तिचे स्वतचे चेंबूर येथे रुट्स क्लिनिक नावाचे एक खाजगी क्लिनिक आहे. तिच्याकडे विविध कामासाठी नऊ कर्मचारी कामाला आहे. क्लिनिकच्या तीन चाव्या असून त्यातील एक चावी फार्मासिस्ट, दुसरी सफाई कर्मचारी मावशी तर तिसरी सरोज कांबळेकडे होती. गेल्या पंधरा दिवसांपासून सरोज ही कामावर येत नसल्याने तिने तिला कामावरुन काढून टाकले होते. क्लिनिकमध्ये पेशंटकडून येणारी फी ड्राव्हरमधील ठेवल्यानंतर काही दिवसांनी ती कॅश बँकेत जमा करणे हा तिचा नियमित कामाचा भाग होता.
गेल्या सहा महिन्यांत तिने दहा लाखांची कॅश ड्राव्हरमध्ये ठेवली होती. क्लिनिकमध्ये पेशंटची जास्त गर्दी असल्याने तिला ती कॅश बँकेत जमा करता आली नव्हती. 6 सप्टेंबरला ती नेहमीप्रमाणे क्लिनिकमधील काम संपल्यानंतर घरी गेली होती. यावेळी तिने तिच्या मोबाईलमध्ये क्लिनिकचे कॅमेर्याची पाहणी केली होती. त्यात तिला सरोज आणि रुपाली या दोघीही तिच्या केबिनमध्ये जाताना दिसून आले. त्यानंतर क्लिनिकमधील सीसीटिव्ही कॅमेरे अचानक बंद झाले होते.
हा प्रकार संशयास्पद वाटताच दुसर्या दिवशी तिने ड्राव्हरमधील कॅशची पाहणी केली होती. त्यात तिला दहा लाखांची कॅश चोरीस गेल्याचे दिसून आले. त्यामुळे तिने या दोघींची चौकशी केली, मात्र त्यांनी या कॅशबाबत काहीही माहिती नसल्याचे सांगून तिला टाळण्याचा प्रयत्न केला. ही कॅश सरोज आणि रुपाली यांनीच चोरी केल्याचा संशय व्यक्त करुन तिने दोघींविरुद्ध चेंबूर पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी सरोज आणि रुपाली यांच्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला होता.
गुन्हा दाखल होताच या दोघींनाही पोलिसांनी अटक केली. तपासात त्या दोघीही सौम्या हेगडे यांच्याकडे गेल्या चार वर्षांपासून नर्समध्ये कामाला होत्या. त्यांना तिच्या ड्राव्हरमधील कॅशबाबत माहिती होती. क्लिनिकमध्ये कोणीही नसताना त्यांनी ड्राव्हरमधील कॅश चोरी केल्याचा संशय आहे. त्यामुळे या दोघींची पोलिसांकडून चौकशी सुरु असून अद्याप चोरीची कॅश हस्तगत करण्यात आली नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.