मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२३ सप्टेंबर २०२४
मुंबई, – मुंबईहून चेन्नईला जाणार्या चेन्नई एक्सप्रेसमध्ये एका सोळा वर्षांच्या मुलीचा विनयभंग झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी विनयभंगासह पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल होताच यश राजेंद्र शिवा या आरोपी तरुणाला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी यश हा चेन्नईचा रहिवाशी असून सध्या एलएलबीचे शिक्षण घेत आहे. गेल्या आठवड्यात तो मुंबईत नोकरीसाठी मुलाखतीसाठी आला होता. चेन्नईला जाताना त्याने या मुलीशी अश्लील चाळे करुन तिचा विनयभंग केल्याचे पोलिसांनी सांगितले.
तकारदार मुलगी ही सोळा वर्षांची असून ती तिच्या आजीसोबत चेन्नई येथे राहते तर तिचे पालक मुंबईत राहतात. गेल्या आठवड्यात ती तिच्या आजीसोबत चेन्नई येथून आई-वडिलांना भेटण्यासाठी आली होती. शनिवारी रात्री ती पुन्हा चेन्नईला जाण्यासाठी छत्रपती शिवाजी टर्मिनस रेल्वे स्थानकात आली होती. यावेळी तिचे वडिल तिच्यासह आजीला सोडण्यासाठी आले होते. चेन्नई एक्सप्रेसने प्रवास करताना यशने या मुलीला नकोसा स्पर्श करुन तिचा विनयभंग केला होता. हा प्रकार तिने तिच्या आजीला सांगितला. त्यामुळे तिने त्याला जाब विचारण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली होती. यावेळी इतर प्रवाशांनी त्याला ताब्यात घेऊन कल्याण येथे ट्रेन आल्यानंतर त्याला रेल्वे पोलिसांच्या स्वाधीन केले होते. यावेळी या मुलीच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपीविरुद्ध यश शिवा याच्याविरुद्ध विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता.
याच गुन्ह्यांत नंतर त्याला अटक करुन पुढील चौकशीसाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले होते. अटकेनंतर त्याला विशेष पोक्सो कोर्टात हजर करण्यात आले होते. प्राथमिक तपासात यश हा चेन्नईचा रहिवाशी असून तो एलएलबीच्या तिसर्या वर्गात शिकत आहे. त्याला अलीकडेच नोकरीचा कॉल आला होता. मुलाखतीसाठी तो गेल्या आठवड्यात मुंबईत आला होता. शनिवारी तो चेन्नई एक्सप्रेसने त्याच्या घरी जात होता. यावेळी त्याने ट्रेनमध्ये सीएसएमटी ते दादर रेल्वे स्थानकादरम्यान या मुलीचा विनयभंग केला होता.