व्यवसायात गुंतवणुकीच्या नावाने साडेसतरा लाखांची फसवणुक
पाच महिन्यांपासून वॉण्टेड असलेल्या आरोपीस अटक व कोठडी
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२५ फेब्रुवारी २०२४
मुंबई, – व्यवसायात गुंतवणुकीच्या नावाने सुमारे साडेसतरा लाखांची फसवणुक करुन गेल्या पाच महिन्यांपासून वॉण्टेड असलेल्या आरोपीस दिडोंशी पोलिसांनी अटक केली. इबाद अफसर बेग असे या आरोपीचे नाव असून फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
मोहम्मद युसूफ शेख हा अंधेरीतील गिल्बर्ट हिल परिसरात राहत असून तो ठाण्याच्या व्हिहीयाना मॉलच्या टॉमी हिलफिंगरच्या दुकानात स्टोअर मॅनेजर म्हणून काम करत होता. यावेळी त्यांची शॉपिंगसाठी तिथे नियमित येणार्या इबादशी त्यांची ओळख झाली होती. जुलै २०२२ रोजी त्यांनी ठाण्यातील ती नोकरी सोडली आणि ते गोरेगाव येथील ओबेरॉय मॉलमध्ये नोकरी करु लागले. तिथेही इबाद हा शॉपिंगसाठी येत होता. त्यामुळे त्यांची चांगली मैत्री झाली होती.
जानेवारी २०२३ रोजी त्याने त्याला भाजी विक्रीसह एलईडी ट्यूबलाईटच्या व्यवसायाबाबत माहिती दिली होती. या व्यवसायात चांगला फायदा होत असल्याने त्याने त्याला या दोन्ही व्यवसायात गुंतवणुकीचा सल्ला दिला होता. त्याच्यावर विश्वास ठेवून त्यांनी त्याच्यासोबत व्यवसाय सुरु करण्याचा निर्णय घेतला होता. व्यवसायासाठी त्याने त्याला सोळा लाख दहा हजार रुपये दिले होते. ही रक्कम त्याने त्याच्या बँक खात्यात आरटीजीएसद्वारे ट्रान्स्फर केली होती.
काही दिवसांनी इबादने त्याचा मोबाईल खराब झाल्याचे सांगून व्यवसायासाठी नवीन मोबाईल घेण्याची विनंती केली. त्यामुळे त्याने त्याला एक लाख तीस हजार रुपयांचा एक महागडा आयफोन हफ्त्यावर घेऊन दिला होता. मात्र मोबाईलचे हप्ते तो भरत नसल्याने त्यांच्या पगारातून ते हप्ते कापले जात होते. तीन चार महिन्यानंतर त्यांनी त्याला त्यांच्या व्यवसायाबाबत विचारणा सुरु केली होती. मात्र हा विषय आला की तो त्यांना टाळण्याचा प्रयत्न करत होता.
हा प्रकार संशयास्पद वाटताच त्याने त्याची चौकशी सुरु केली होती. यावेळी त्यांना इबादने कुठलाही व्यवसाय सुरु केला नव्हता. व्यवसायासाठी घेतलेल्या पैशांचा परस्पर अपहार करुन त्यांची सुमारे साडेसतरा लाखांची फसवणुक केली होती. त्यामुळे त्यांनी त्याच्याकडे पैशांची मागणी सुरु केली होती. मात्र वारंवार आश्वासन देऊनही त्याने पैसे परत केले नाही. त्यामुळे त्यांनी त्याच्याविरुद्ध दिडोंशी पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर सप्टेंबर २०२३ रोजी इबादविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदविला होता.
गुन्हा दाखल होताच तो पळून गेला होता. त्यामुळे त्याचा पोलिसांकडून शोध सुरु होता. ही शोधमोहीम सुरु असताना वॉण्टेड असलेल्या इबादला पाच महिन्यांनी पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. व्यवसायात गुंतवणुकीच्या नावाने त्याने अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केले आहेत का याचा पोलीस तपास करत आहेत.