मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२५ फेब्रुवारी २०२४
मुंबई, – बोगस धनादेशावर स्वाक्षरी करुन रेल्वे गुड्स क्लिअरिंग ऍण्ड फॉरवडिंग इस्टॅब्लिशमेंट लेबर बोर्डच्या बँक खात्यातून सुमारे पाच कोटीचा अपहार करुन फसवणुक करणार्या कटातील दोन मुख्य आरोपींना मध्यप्रदेशातून आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी अटक केली. कौशलेंद्र मधुकर देकांते आणि विरेंद्र हरिकिशन दहिकर अशी या दोघांची नावे असून ते दोघेही मध्यप्रदेशच्या बालाघाटचे रहिेवाशी आहेत. या दोघांकडून पोलिसांनी २५ लाखांची कॅश जप्त केली आहे. अटकेनंतर मुंबईत आणल्यानंतर या दोघांनाही शनिवारी दुपारी किल्ला न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
यातील तक्रारदार रेल्वे गुड्स क्लिअरिंग ऍण्ड फॉरवडिंग इस्टॅब्लिशमेंट लेबर बोर्डचे अध्यक्ष आहेत. या मंडळाची मशीदबंदर येथील खांडबाजारच्या बँक ऑफ बडोदा बँकेत एक अकाऊंट आहे. त्यांच्या मंडळाच्या आठ बोगस धनादेशाची चोरी करुन अध्यक्षासह इतर पदाधिकार्यांची स्वाक्षरी करुन अज्ञात व्यक्तींनी मध्यप्रदेशच्या छत्तीसगढ येथील बँक ऑफ बडोदाच्या अधिकारी आणि कर्मचार्यांशी संगनमत करुन मंडळाच्या पाच कोटी सहा लाख पाच हजार रुपयांचा परस्पर अपहार करुन फसवणुक केली होती. तीन वर्षांपूर्वी हा प्रकार लक्षात येताच तक्रारदारांनी पायधुनी पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. या तक्रारीनंतर अज्ञात व्यक्तीविरुद्ध पोलिसांनी ४०६, ४०९, ४१९, ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७१, १२० ब, ३४ भादवी कलमांतर्गत गुन्हा नोंदविला होता. या गुन्ह्यांची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत त्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविला होता.
गुन्ह्यांचे कागदपत्रे हाती येताच तपासादरम्यान कौशलेंद्र देकाते याने रेल्वे गुड्स क्लिअरिंग ऍण्ड फॉरवडिंग इस्टॅब्लिशमेंट लेबर बोर्डच्या दोन बोगस धनादेशावर ९४ लाख २१ हजार आणि ९७ लाख २१ हजार अशी रक्कम भरुन १ कोटी ९१ लाख ४२ हजार रुपये तर विरेंद्र दहिकर याने अन्य एका धनादेशचा वापर करुन ७१ लाख ६० हजाराची रक्कम त्यांच्या बालाघाट येथील बँक खात्यात ट्रान्स्फर केली होती. ही रक्कम या दोघांनी नंतर विविध बँक खात्यात ट्रान्स्फर केली होती. तपासात ही बाब उघडकीस येताच आर्थिक गुन्हे शाखेचे एक विशेष पथक मध्यप्रदेशात पाठविण्यात आले होते. या अधिकार्यांनी कोलवाली पोलिसांच्या मदतीने कौशलेंद्र देकाते आणि विरेंद्र दहिकर या दोघांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीदरम्यान त्यांचा या गुन्ह्यांत सहभाग उघडकीस आला होता. त्यानंतर त्यांना अटक करुन तेथील स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने ट्रॉन्झिंट रिमांड दिल्यानंतर दोन्ही आरोपींना पुढील चौकशीसाठी मुंबईत आणण्यात आले होते. त्यांच्याकडून पोलिसांनी २५ लाखांची कॅश जप्त केली आहे.
मुंबईत आल्यानंतर त्यांना शनिवारी किल्ला न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. या दोघांची सध्या पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. या दोघांनी बँकेत वटविलेले बोगस चेक कसे व कुठे बनविले. तक्रारदाराच्या बँकेची माहिती आरोपींना कोणाकडून मिळाली. तक्रारदाराचे बँक खात्याचे सिगनेटरी हस्ताक्षराबाबत त्यांना माहिती कोणी दिली. या चेकवर सह्या कोणी केल्या. चेक वटल्यानंतर फसवणुक केलेल्या रक्कमेची कशी विल्हेवाट लावली. बँक खात्यात पैसे ट्रान्स्फर झाल्यानंतर ती रक्कम कोणाकोणाच्या बँक खात्यात ट्रान्स्फर करण्यात आली होती. या गुन्ह्यांत त्यांचा काय सहभाग आहे. याकामी त्यांना बँकेच्या अधिकार्यासह कर्मचार्यांनी मदत केली होती का, त्यांचे इतर कोण सहकारी आहेत याचा आता पोलीस तपास करत आहेत. या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे बाहेर येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.