ट्रॅव्हेल्स व्यावसायिक महिलेची तेरा लाखांची फसवणुक
चार महिन्यांपासून वॉण्टेड असलेल्या व्यावसायिकाला अटक
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२९ फेब्रुवारी २०२४
मुंबई, – ट्रॅव्हेल्स व्यावसायिक महिलेची सुमारे तेरा लाखांची फसवणुक केल्याचा आरोप असलेल्या अमीत राजाबाबू सिंग या आरोपी व्यवसायिकाला चार महिन्यानंतर कांदिवली पोलिसांनी अटक केली. फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. अमीत सिंगवर अमेरिकेत पाठविलेल्या दोन व्यक्तीच्या बुकींगसाठी अतिरिक्त पेमेंट घेऊन पैशांचा अपहार करुन फसवणुक केल्याचा आरोप आहे.
राखी मिहीर लखानी ही महिला कांदिवलीतील महावीरनगर परिसरात राहत असून ती ट्रॅव्हेल्स व्यावसायिक आहे. तिची स्वतची एक कंपनी असून या कंपनीत तिचे पती सीईओ म्हणून काम पाहतात. अमीत सिंग हा तिच्या पतीचा मित्र असून त्याने नव्याने स्वतची टुर्स ऍण्ड ट्रॅव्हेल्सचा व्यवसाय सुरु केला होता. मे २०२३ रोजी तिने त्याला दोन व्यक्तीसाठी अमेरिकेत पंधरा दिवसांचे हॉटेल बुकींग करण्यास सांगितले होते. यावेळी त्याने तिला हॉटेल बुकींगसाठी सव्वापाच लाख रुपये तर वेगवेगळ्या तीन ठिकाणी जाण्याचा ३५ लाख रुपये खर्च अपेक्षित असल्याचे सांगितले होते, त्यामुळे तिने त्याला ऑनलाईन ४० लाख ६३ हजार रुपये ट्रान्स्फर केले होते.
याच दरम्यान अमीतने तिला फोन करुन त्याचे क्रेडिट कार्ड चालत नसून तिने त्याला आणखीन काही रक्कम पाठवून द्यावी, ही रक्कम तो तिला नंतर परत करेल असे सांगितले होते. त्याच्यावर विश्वास ठेवून तिने त्याला सुमारे तेरा लाख रुपये ट्रान्स्फर केले होते. नंतर त्याने तिला काही रक्कम ट्रान्स्फर केली होती. मात्र तेरा लाख अतिरिक्त घेऊन त्याने ही रक्कम तिला परत केली नव्हती. वारंवार विचारणा करुनही तो पेमेंट करत नव्हता. त्याच्याकडून फसवणुक झाल्याचे निदर्शनास येताच तिने अमीत सिंगविरुद्ध कांदिवली पोलिसांत तक्रार केली होती.
या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्याच्याविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदविला होता. गुन्हा दाखल होताच अमीत हा पळून गेला होता. गेल्या चार महिन्यांपासून त्याचा पोलीस शोध घेत होते. ही शोधमोहीम सुरु असतानाच मंगळवारी २७ फेब्रुवारीला वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर गणोरे यांच्या पथकाने वॉण्टेड असलेल्या अमीत सिंगला अटक केली. चौकशीत त्याने तेरा लाखांचा अपहार केल्याची कबुली दिली आहे. अटकेनंतर त्याला बुधवारी बोरिवलीतील स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु असून त्याने अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केले आहेत का याचा पोलीस तपास करत आहेत.