लग्नाच्या आमिषाने विश्वास संपादन करुन शिक्षिकेची फसवणुक
भावी पतीनेच विविध कारण सांगून २२ लाख रुपये उकाळले
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२३ फेब्रुवारी २०२४
मुंबई, – लग्नाचे आमिष दाखवून विश्वास संपादन केलेल्या एका शिक्षिकेची तिच्याच होणार्या भावी पतीने सुमारे २२ लाख रुपयांची फसवणुक केल्याचा प्रकार पायधुनी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी शिक्षिकेच्या तक्रारीवरुन आरोपीविरुद्ध पायधुनी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. इम्रानअली फैजअली खान असे या आरोपीचे नाव असून तो मूळचा आंधप्रदेशच्या हैद्रबादचा रहिवाशी असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. लग्नाच्या आमिषाने त्याने अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
४२ वर्षांची तक्रारदार महिला शिक्षिका असून ती तिच्या वयोवृद्ध आई आणि अविवाहीत बहिणीसोबत पायधुनी परिसरात राहते. फोर्ट येथे एका खाजगी शाळेत ती शिक्षिका म्हणून काम करते. मे २०२३ तिने लग्नासाठी एका संकेतस्थळावर स्वतचे नाव नोंदविले होते. त्यानंतर तिला काही तरुणांचे प्रोफाईल पाठविण्यात येत होते. त्यात इम्रानअलीचा समावेश होता. तो आंधप्रदेशच्या हैद्राबादचा रहिवाशी होता. त्याची प्रोफाईल आवडल्याने तिने त्याला संपर्क साधून त्याच्यासह त्याच्या कुटुंबियांविषयी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी त्याने त्याच्या आई-वडिलांचे निधन झाले असून त्याचा इमारत कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रक्टरचा व्यवसाय असल्याचे सांगितले. तो सध्या त्याच्या मावशीसोबत राहत असून त्याचे दोन्ही भाऊ कॅनडा येथे शिक्षणासाठी स्थायिक झाल्याचे सांगितले. त्यानंतर ते दोघेही मोबाईलसह व्हॉटअपच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात होते.
याच दरम्यान त्यांची चांगली मैत्री झाली होती. काही दिवसांनी इम्रान हा मुंबईत तिला भेटण्यासाठी आला होता. त्यावेळेस तो भेंडीबाजार येथील एका हॉटेलमध्ये थांबला होता. तिथेच त्यांची पहिल्यांदा भेट झाली होती. हॉटेलच्या रुममध्ये त्याने तिच्याकडे शारीरिक सुखाची मागणी केली. मात्र तिने त्यास नकार दिला. त्यानंतर ते दोघेही गिरगाव चौपाटी येथे फिरायला गेले होते. त्यानंतर तो अधूनमधून तिला भेटण्यासाठी मुंबईत येत होता. मे २०२३ रोजी त्याने तिला त्याच्या परिचित सबाहत या महिलेला भायखळा येथे एक प्लॉट खरेदी करायचा आहे. त्यासाठी तिने त्याला आर्थिक मदत करावी अशी विनंती केली होती. त्यामुळे तिने तिचे फिक्स डिपॉझिट मोडून त्याला १५ लाख ३० हजार रुपये दिले होते. ही रक्कम दिल्यानंतर तो सतत तिच्याकडे पैशांची मागणी करत होता. मावशीला भाड्याने घर घेण्यासाठीही त्याने तिच्याकडून ३५ हजार रुपये घेतले होते.
काही दिवसांनी त्याने तिला फोन करुन त्याला हैद्रबाद वन अधिकार्यांनी जमिनीसंदर्भातील एका गुन्ह्यांत अटक केली आहे. या प्रकरणात बाहेर काढण्यासाठी त्याच्याकडे पैशांची मागणी केली जात आहे. त्यामुळे तिने त्याला मदत करावी अशी विनंती केली होती. त्यामुळे तिने त्याला पुन्हा ऑनलाईन पैसे पाठवून दिले होते. इम्रानकडून विविध कारण सांगून सतत पैशांची मागणी होत असल्याने तिला शंका आली होती. मात्र तो तिच्याशी लग्न करणार असल्याने तिने त्याकडे दुर्लक्ष केले होते.
अशा प्रकारे मे ते ऑक्टोंबर २०२३ या कालावधीत लग्नाचे आमिष दाखवून, तिचा विश्वास संपादन करुन त्याने तिच्याकडून २१ लाख ७३ हजार रुपये घेतले होते. ही रक्कम परत करतो असे सांगून त्याने तिला पैसे परत केले नाही. काही दिवसांनी पैसे देण्यास नकार दिल्यानंतर त्याने तिच्याशी संपर्क तोडला होता. तिला प्रतिसाद देणे बंद केले होते. हा प्रकार संशयास्पद वाटताच तिने पायधुनी पोलिसांना घडलेला प्रकार इम्रानविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. लवकरच त्याची पोलिसांकडून चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार आहे. इम्रानने अशाच प्रकारे लग्नाचे आमिष दाखवून विश्वास संपादन करुन इतर काही महिलांची फसवणुक केली आहे का याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.