व्यवसायाच्या गुंतवणुकीवर आकर्षक व्याजाच्या आमिषाने फसवणुक
महिलेला ४५ लाखांना गंडा घालणार्या पिता-पूत्राविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२९ फेब्रुवारी २०२४
मुंबई, – नवीन व्यवसायाच्या गुंतवणुकीवर आकर्षक व्याजदर देण्याचे आमिष दाखवून एका महिलेची तिच्याच परिचित पिता-पूत्राने सुमारे ४५ लाख रुपयांची फसवणुक केल्याचा प्रकार बोरिवली परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरुन कस्तुरबा मार्ग पोलिसांनी मुकेशभाई शहा आणि पारितोष मुकेशभाई शहा या पिता-पूत्राविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. व्यवसायात गुंतवणुकीच्या नावाने या दोघांनी अशाच प्रकारे काही लोकांची फसवणुक केली आहे का याचा पोलीस तपास करत आहेत.
४३ वर्षांची तक्रारदार महिला ही बोरिवलीतील दत्तपाडा रोडवर राहते. ती घरोघरी जाऊन भगवान राधाकृष्ण यांचे सत्संग करते. त्यातून मिळणारी दक्षिणा म्हणून तिला काही ठराविक रक्कम मानधन म्हणून मिळते. जानेवारी २०२२ रोजी ती सत्संगच्या एका कार्यक्रमासाठी गेली होती. तिथेच तिची ओळख मुकेशभाई या ६५ वर्षांच्या वयोवृद्धाशी झाली होती. या ओळखीदरम्यान तिला मुकेशभाई हा त्याच्या कुटुंबियांसोबत ठाण्यातील कोळशेत रोड, प्राईड प्रेसिडेन्सी लक्झरी अपार्टमेंटमध्ये राहत असल्याचे समजले होते. पारितोष हा त्याचा मुलगा असून त्याचे अनेक व्यवसाय आहे. या व्यवसायात त्याला यश न आल्याने त्याने नवीन व्यवसाय सुरु करण्याचा निर्णय घेतला होता. त्याच्या नवीन व्यवसायात तिने गुंतवणुक करावी, या गुंतवणुकीवर तिला दरमाह चार टक्के आकर्षक व्याजदर देण्याचे आमिष मुकेशभाईने दाखविले होते. त्यामुळे तिने त्याच्याकडे दिड लाखांची गुंतवणुक केली होती. या गुंतवणुकीवर मुकेशभाई आणि पारितोष तिला दरमाह चार टक्के व्याजदराची रक्कम देत होते. त्यामुळे तिला त्यांच्यावर विश्वास निर्माण झाला होता.
काही दिवसांनी त्यांनी तिच्याकडे आणखीन काही पैशांची मागणी केली होती. या पैशांवर तिला जास्त व्याजदर देण्याचे आश्वासन दिले होते. त्यांच्यावर विश्वास ठेवून तिने त्याच्या नवीन व्यवसायाच्या गुंतवणुकीसाठी सुमारे ४५ लाख रुपये दिले होते. सप्टेंबर २०२२ पर्यंत त्यांनी तिला परतावा दिला. मात्र नंतर त्यांनी व्याजाची रक्कम देणे बंद केले. याबाबत त्यांच्याकडे विचारणा केल्यानंतर ते दोघेही विविध कारण साूंन तिला टाळण्याचा प्रयत्न करत होते. जानेवारी २०२३ पासून शहा पिता-पूत्राने तिचा फोन घेणे बंद केले होते. फेब्रुवारी २०२३ रोजी तिला परितोष बोरिवली रेल्वे स्थानकात भेटला होता. यावेळी तिने त्याच्याकडे तिच्या पैशांची विचारणा केली असता त्याने तिला पैशांवरुन शिवीगाळ करुन धमकी दिली होती.
या दोघांकडून आर्थिक फसवणुक झाल्याचे लक्षात येताच तिने त्यांच्याविरुद्ध कस्तुरबा मार्ग पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर मुकेशभाई शहा आणि पारितोष शहा या दोघांविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदविल आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून लवकरच त्यांची पोलिसांकडून चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार आहे. या चौकशीनंतर त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले.