सूड घेण्यासाठी दुसर्यांना गंडा घालणार्या मुख्य आरोपीसह दोघांना अटक
फसवणुकीच्या पैशांतून मौजमजा करत असल्याचे तपासात उघड
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१ मार्च २०२४
मुंबई, – भाड्याने फ्लॅट देण्याच्या आमिषाने एका ३५ वर्षांच्या महिलेची फसवणुक करणार्या एका टोळीचा एमआयडीसी पोलिसांनी पर्दाफाश करुन मुख्य आरोपीसह दोघांना अटक केली. स्वप्नील जाधव आणि ग्यानवेंद्र सहानी अशी या दोघांची नावे असून त्यांच्याकडून पोलिसांनी पाच मोबाईल जप्त केले आहेत. स्वप्नीलची अशाच प्रकारे अज्ञात सायबर ठगांकडून फसवणुक झाली होती, त्याचा सूड म्हणून तो दुसर्यांना गंडा घालत होता. फसवणुकीच्या पैशांतून ते दोघेही मौजमजा करत असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. अटकेनंतर या दोघांनाही स्थानिक न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
तक्रारदार महिला मूळची मध्यप्रदेशच्या इंदौर शहराची रहिवाशी असून ती एका खाजगी कंपनीत अकाऊंट म्हणून काम करते. सध्या ती तिच्या मैत्रिणीसोबत अंधेरीतील मरोळ परिसरातील एका भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहते. तिला भाड्याने दुसर्या फ्लॅटची गरज असल्याने तिने एका खाजगी वेबसाईटवरील क्रमांकावर भाड्याच्या फ्लॅटविषयी विचारणा केली होती. यावेळी संजयकुमार नाव सांगणार्या या व्यक्तीने त्याच्या मालकाचे अंधेरीतील डी. एन नगर, साई द्वारका अपार्टमेंटमध्ये एक फ्लॅट असल्याचे सांगून तिला फ्लॅटचे काही फोटो पाठविले. तो फ्लॅट आवडल्याने तिने संजयकुमारला त्याच्या फ्लॅट भाड्याने घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. यावेळी त्यांच्यात एक लाख रुपये डिपॉझिट आणि २९ हजार भाडे असे ठरले होते. तिने डिपॉझिटसह भाडे देण्याची तयारी दर्शवून फ्लॅटची पाहणी केल्यानंतर त्याला पूर्ण रक्कम देऊ असे सांगितले. यावेळी त्याने आधीच एका व्यक्तीकडून टोकन घेतले असून ती रक्कम त्याला परत केल्यानंतर तो तिला फ्लॅट दाखवेन असे सांगून तिला ऑनलाईन काही पेमेंट करण्यास सांगितले. त्यामुळे तिने त्याला अकरा हजार रुपये ऑनलाईन ट्रान्स्फर करुन करारासाठी तिचे आधारकार्ड, पॅनकार्ड, पासपोर्टचे फोटो व्हॉटपवर पाठविले होते.
दुसर्या दिवशी त्याने तिच्याकडून आणखीन अठरा हजारची मागणी केली. त्यामुळे तिने त्याला पुन्हा अठरा हजार रुपये ट्रान्स्फर केले होते. २३ जानेवारीला त्याने तिला फोन करुन सोसायटीचे सव्वालाखाचे मेन्टनन्स बाकी असून फ्लॅटचे भाडे करार करण्यासाठी त्याला सोसायटीची एनओसी लागेल. त्यामुळे मेटन्टन्ससाठी त्याने तिच्याकडून आणखीन ७१ हजाराची मागणी केली होती. संजयकुमारला पैशांची अडचण असल्याने तिने त्याला ती रक्कम ऑनलाईन ट्रान्स्फर केली. २४ जानेवारीला ती त्याच्या सांगण्यावरुन फ्लॅट पाहण्यसाठी साई द्वारका अपार्टमेंटजवळ आली होती. तिने संजयकुमारला कॉल केला, मात्र त्याने तिला प्रतिसाद दिला नाही. काही वेळानंतर त्याचा फोन बंद झाला. तिने त्याला वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा फोन बंद येत होता. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच तिने ऑनलाईन १९३० क्रमांकावर तक्रार केली होती. त्यानंतर ती तिच्या मध्यप्रदेशातील घरी निघून गेली होती. १२ फेब्रुवारीला ती मुंबईत परत आली. यावेळी तिने एमआयडीसी पोलीस ठाण्यात जाऊन तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगून संजयकुमारविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश गायकवाड यांनी गंभीर दखल घेत पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते.
या आदेशानंतर पोलिसांनी अज्ञात सायबर ठगाविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदविला होता. गुन्हा दाखल होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश गायकवाड यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक महेश काळे, पोलीस उपनिरीक्षक राहुल पाटील, पोलीस अंमलदार नाईक, पिसाळ, भावसार यांनी तपास सुरु केला होता. तांत्रिक माहितीवरुन पोलिसांनी खडवली येथून स्वप्नील जाधव आणि ग्यानवेंद्र सहानी या दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीत या दोघांनी गुन्ह्यांची कबुली देताना फसवणुकीच्या पैशांतून मौजमजा केल्याचे सांगितले. काही वर्षांपूर्वी स्वप्नीलची अशाच प्रकारे फसवणुक झाली होती. त्याचा सूड म्हणून त्याने अनेकांची फसवणुक करण्यास सुरुवात केली होती. एका खाजगी वेबसाईटवर बोगस नावाने क्रमांक सेव्ह करुन तो फ्लॅट भाड्याने द्यायचा आहे असे सांगत होता. फसवणुकीची रक्कम तो ग्यानवेंद्र सहानीच्या बँक खात्यात ट्रान्स्फर करण्यास सांगत होता. फसवणुकीच्या पैशांतून विकत घेतलेले पाच मोबाईल पोलिसांनी हस्तगत केले आहे. पोलीस पकडू नये म्हणून ते सतत सिमकार्ड बदलत होते. या दोघांनी अंधेरीतील डी. एन नगर परिसरात भाड्याने फ्लॅट देतो असे सांगून आतापर्यंत अनेकांना गंडा घातला असून त्यांच्या अटकेने अशाच इतर काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.