व्यवसायाच्या नावाने विदेशी कंपनीला सव्वादहा कोटीचा चुना
६२ कन्टेनर्स, ११ रॅम्पसह गुंतवणुकीसाठी घेतलेल्या सव्वादहा कोटीचा अपहार
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२ मार्च २०२४
मुंबई, – भारतात व्यवसाय करण्याचे आमिष दाखवून डेन्मार्क येथील एका नामांकित विदेशी कंपनीची कोट्यवधी रुपयांची फसवणुक झाल्याचा धक्कादायक प्रकार गोरेगाव परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी पाचजणांविरुद्ध वनराई पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. आकाश अग्रवाल, नरेश अग्रवाल, मुरारीलाल अग्रवाल, राजेश अग्रवाल आणि अक्षय पंत अशी या पाचजणांची नावे असून पाचही आरोपी क्रिस्टल लॉजिस्टिक कुल चैन लिमिटेड कंपनीचे संचालकासह वरिष्ठ पदाधिकारी असल्याचे पोलिसांनी सांगितले. विदेशातून भारतात पाठविलेल्या ८ कोटी ३३ लाख रुपयांच्या ६२ कन्टेनर्स, ११ रॅम्पसह गुंतवणुकीसाठी दिलेल्या १ कोटी ८७ लाख रुपये अशा सुमारे सव्वादहा कोटीचा अपहार करुन या विदेशी कंपनीची फसवणुक केल्याचा पाचही संचालकासह पदाधिकार्यावर आरोप आहे. लवकरच या आरोपींची पोलिसांकडून चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार आहे.
ज्युलियाना ओटो इंग्स्टुप ही ४१ वर्षांची तक्रारदार महिला डेन्मार्क रहिवाशी असून ती टायटन कन्टेनर्स या विदेशातील एका नामांकित कंपनीत संचालक म्हणून काम करते. ही कंपनीत कन्टेनर्स तयार करण्याचे तसेच विविध देशात पुरविण्याचे काम करते. २०१२ साली त्यांना भारतात त्यांच्या कंपनीचा विस्तार करुन व्यवसाय सुरु करायचा होता. त्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु होते. याच दरम्यान त्यांच्या कंपनीचे व्यावसायिक डेव्हल्पर मॅनेजर पॅट्रीक स्मेडली हे हैद्राबाद येथे आले होते. तिथे त्यांची आकाश अग्रवालशी ओळख झाली होती. आकाशने त्यांना त्याची क्रिस्टल लॉजिस्टिक कुल चैन लिमिटेड नावाची कंपनी असून ही कंपनी कन्टेनर्स व्यवसायातील भारतातील नामांकित कंपनी आहे. त्यांची कंपनी कन्टेनर्सची देखभाल करणे, कन्टेनर्स एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी वाहतूक करण्याचे काम करते असे सांगून त्यांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला. इतकेच नव्हे तर त्यांना त्याच्या कंपनीसोबत भारतात पार्टनरशीपमध्ये व्यवसाय सुरु करण्याची ऑफर दिली होती.
एक वर्षांनी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक लेलँड हे दिल्लीत आले होते. तिथेच पॅट्रीक यांनी त्यांची आकाश अग्रवालसोबत भेट घडवून आणली होती. चर्चेदरम्यान त्यांच्यात एक संयुक्त वेंचर कंपनी उघडण्याचे ठरविले होते. याच दरम्यान दोन्ही कंपन्यांमध्ये एक संयुक्त करार झाला होता. या करारावर आकाशसह नरेश अग्रवाल, मुरारीलाल, राजेश आणि अक्षय पंत यांची संचालक म्हणून स्वाक्षरी होती तर लेलँड आणि पॅट्रीक स्मेडली यांची नॉमिनी संचालक म्हणून नेमणूक करण्यात आली होती. या करारानंतर त्याच्यावर विश्वास ठेवून त्यांनी त्याच्या कंपनीला विदेशातून ८ कोटी ३३ लाख रुपयांचे ६२ कंन्टेनर्स आणि ११ रॅम्प पाठविले होते. तसेच कंपनीच्या होर्डिंग्स, कायदेशीर सल्ला घेणे आदी सेटअपसाठी डिसेंबर २०१३ ते डिसेंबर २०२४ या कालावधीत १ कोटी ८७ लाखांची (दोन लाख वीस हजार डॉलर) गुंतवणुक केली होती. त्यात भारतात पाठविण्यात आलेल्या कन्टेनर्स आणि रॅम्पसाठी लागणारे इम्पोर्ट ड्यूटीचा समावेश होता.
ही रक्कम आकाश अग्रवालच्या क्रिस्टल लॉजिस्टिक कुल चैन लिमिटेड या कंपनीच्या बँक खात्यात ट्रान्स्फर करण्यात आली होती. ही रक्कम मिळाल्यानंतर आकाशने त्यांना खर्चाचे काही बिल पाठवून दिले होते. मात्र उर्वरित हिशोबाचा तपशील दिला नव्हता. वांरवार विचारणा करुनही त्याच्या कंपनीकडून कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आले नव्हते. चौकशीदरम्यान तक्रारदारांना आकाशसह इतर संचालकांनी इम्पोर्ट ड्यूटी भरली नव्हती. त्यामुळे अग्रवाल कंपनीला मेल पाठवून त्यांच्याकडून गुंतवणुक केलेल्या रक्कमेसह भारतात पाठविलेल्या कन्टेनर्स आणि रॅम्पविषयी विचारणा करण्यात आली होती. मात्र या मेलला कंपनीने प्रतिसाद दिला नाही. चौकशीदरम्यान या कंपनीने त्यांनी पाठविलेल्या कन्टेनर्स आणि रॅम्पची परस्पर केल्याचे उघडकीस आले होते.
अशा प्रकारे या आरोपींनी भारतात व्यवसाय करण्याचे आमिष दाखवून तक्रारदाराच्या कंपनीकडून घेतलेल्या ६२ कन्टेनर्स आणि ११ रॅम्पची विक्री कंपनीची १० कोटी २० लाखांची फसवणुक केली होती. हा प्रकार उघडकीस येताच कंपनीच्या वतीने ज्युलियाना ओटो इंग्स्टुप यांनी वनराई पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर आकाश अग्रवाल, नरेश अग्रवाल, मुरारीलाल अग्रवाल, राजेश अग्रवाल आणि अक्षय पंत या पाचजणांविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदविला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून लवकरच या पाचही आरोपींची पोलिसांकडून चौकशी होणार आहे.