पदाचा गैरवापर करुन अधिकार्याकडून कंपनीत गैरव्यवहार
दिड वर्षांत कंपनीच्या दोन कोटीचा अपहार करुन फसवणुक
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
९ मार्च २०२४
मुंबई, – सिनिअर अकाऊंट मॅनेजर पदावरील एका अधिकार्यानेच कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार करुन कंपनीची फसवणुक केल्याचा धक्कादायक घटना अंधेरी परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी रोहन धनुका या अधिकार्याविरुद्ध आंबोली पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंद केला आहे. त्याच्यावर दिड वर्षांत कंपनीच्या दोन कोटी पंधरा लाख रुपयांचा अपहार करुन फसवणुक केल्याचा आरोप आहे. याच गुन्ह्यांत त्याची लवकरच पोलिसांकडून चौकशी होणार आहे.
अंधेरीतील आझाद मैदान परिसरात तक्रारदार व्यावसायिक असून त्यांचा स्वतचा इव्हेंट मॅनेजमेंटचा व्यवसाय आहे. त्यांची एक खाजगी कंपनी असून या कंपनीचे कार्यालय अंधेरीतील जे. पी रोड, अमेया हाऊसच्या पहिल्या मजल्यावर आहे. ११ नोव्हेंबर २०२१ रोजी कंपनीत रोहन हा सिनिअर अकाऊंट मॅनेजर म्हणून रुजू झाला होता. त्याच्याकडे कंपनीच्या सर्व आर्थिक व्यवहाराची जबाबदारी होती. कर्मचार्यांसह इव्हेंट वेंडर आदींना पेमेंट करणे आदी काम तोच पाहत होता. रोहन कामात हुशार असल्याने त्याच्यावर तक्रारदारांचा प्रचंड विश्वास होता. गेल्या वर्षी कंपनीतील व्यवहाराचे ऑडिट झाले होते. त्यात कंपनीत कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे दिसून आले होते. त्यामुळे संबंधित अधिकार्यांना ही माहिती तक्रारदारांना सांगितली होती. त्याची त्यांनी गंभीर दखल घेत चौकशी सुरु केली होती. या चौकशीदरम्यान रोहनने कंपनीत गैरव्यवहार केल्याचे उघडकीस आले होते.
२ एप्रिल २०२२ ते ९ ऑक्टोंबर २०२३ या कालाधीत त्याने कंपनीच्या बँक खात्यातून विविध इव्हेंट वेंडर यांना देण्यात येणार्या एकूण रक्कमेपैकी २ कोटी १५ लाख रुपयांची रक्कम स्वतच्या बँक खात्यात ट्रान्स्फर केली होती. ही रक्कम इव्हेंट वेंडर यांना देण्यात आल्याचे भासवून नोंदीमध्ये फेरफार केली होती. आपल्या पदाचा गैरवापर करुन त्याने पैशांचा अपहार करुन कंपनीची फसवणुक केली होती. हा प्रकार उघडकीस येताच तक्रारदारांनी रोहनविरुद्ध आंबोली पोलिसांत लेखी अर्जाद्वारे तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर रोहन धनुकाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. लवकरच त्याची पोलिसांकडून चौकशी होणार आहे. या चौकशीनंतर त्याच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई होईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले.