मासे व्यवहारातील तामिळनाडूच्या पार्टीला पाठविलेल्या पैशांचा अपहार

एक कोटी दहा लाखांच्या अपहारप्रकरणी चौकडीविरुद्ध गुन्हा

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१३ मार्च २०२४
मुंबई, – मासे व्यवहारातील तामिळनाडू येथील पार्टीला पाठविलेल्या एक कोटी दहा लाख रुपयांचा एका चौकडीने अपहार केल्याची घटना पोफळवाडी परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी चारही आरोपीविरुद्ध एल. टी मार्ग पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदवून त्यांचा शोध सुरु केला आहे. आरोपींमध्ये अमृत जयंती पटेल, सोनूभाई व इतर दोघांचा समावेश आहे.

६२ वर्षांचे वेलनकंडी अश्रफ यांचा मासे एक्सपोर्टचा व्यवसाय असून त्यांची व्ही. के अश्रफ इंटरप्रायझेस नावाची मोदी स्ट्रिट, इस्पानी इमारतीमध्ये एक कंपनी आहे. मुंबईसह केरळ शहरात त्यांच्या कंपनीचे एक कार्यालय असून दोन्ही कार्यालयाची जबाबदारी ते स्वत पाहतात. भारतानंतर त्यांनी त्यांचा व्यवसाय विदेशात वाढविण्यासाठी दुबई, ओबान, सौदी अरेबिया आणि बेहरीन आदी देशांत मासे निर्यात करण्यास सुरुवात केली होती. त्यासाठी आवश्यक सर्व परवाने त्यांनी घेतले होते. मुंबईत वैश्णव के. टी तर केरळ येथे त्यांचा मित्राचा मुलगा मोहम्मद मोहसीन हा मॅनेजर म्हणून काम पाहतात. या दोघांवर त्यांचा प्रचंड विश्‍वास होता. त्यांचा बहुतांश व्यवहार रोख स्वरुपात चालते. त्यामुळे मासे निर्यात केल्यानंतर त्यांना कॅश स्वरुपात पैसे मिळत होते. ही रक्कम ते मुंबईतील कार्यालयात जमा करत होते.

फेब्रुवारी महिन्यांत तामिळनाडू येथील मोहम्मद बशीर यांच्यासोबत त्यांचा मासे खरेदी-विक्रीचा व्यवहार झाला होता. या व्यवहारातील सुमारे दिड कोटीचे पेमेंट त्यांना मोहम्मद बशीर यांना द्यायचे होते. ही रक्कम तिथे पाठविण्यासाठी त्यांनी अमृत जयंती पटेलला संपर्क साधला होता. अमृत हा त्यांच्या परिचित असून त्याने यापूर्वीही त्यांचे पैसे पार्टीला कुरिअरद्वारे पाठविले होते. त्यामुळे त्यांनी त्याच्याकडे विचारणा केली असता त्याने सोनूभाईचा मोबाईल क्रमांक देऊन तो त्यांचे पेमेंट मोहम्मद बशीर यांना देईल असे सांगितले. वेलनकंडी हे तामिळनाडू येथे असल्यानेत त्यांनी त्यांचा मॅनेजर मोहम्मद मोहसीनला त्याला एक कोटी दहा लाख रुपये देण्यास सांगितले. त्यामुळे तो सोनूभाईसह इतर दोघांसोबत पोफळवाडी येथे गेला होता. तिथे त्यांनी सोनूभाईला एक कोटी दहा लाख रुपये दिले होते. यावेळी त्याने ही रक्कम अर्ध्या तासांत तामिळनाडूच्या कोईम्बतूरच्या मोहम्मद बशीर यांच्या बँक खात्यात जमा होईल असे सांगितले.

काही वेळानंतर वेलनकंडी अश्रफ यांनी मोहम्मद बशीर यांना फोन करुन पैसे मिळाले का याबाबत विचारणा केली. मात्र त्यांनी अद्याप पेमेंट मिळाले नसल्याचे सांगितले. त्यामुळे त्यांनी मोहसीनला फोन करुन याबाबत शहानिशा करण्यास सांगितले. मोहसीनने सोनूभाईला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचा संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे तो एच. एम इंटरप्रायझेज कुरिअर सर्व्हिस कार्यालयात गेला होता. तिथे चौकशी केल्यानंतर सोनूभाईने ही रक्कम तामिळनाडू येथे न पाठविता अहमदाबाद येथे पाठविल्याचे समजले. हा प्रकार संशयास्पद वाटताच मोहसीनने पुन्हा जयंतीसह सोनूभाईला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र या दोघांचेही फोन बंद येत होते. या दोघांनी त्यांच्या इतर दोन सहकार्‍यांच्या मदतीने तामिळनाडू येथे पाठविण्यात येणार्‍या एक कोटी दहा लाख रुपयांचा अपहार करुन त्यांची फसवणुक केली होती. हा प्रकार लक्षात येताच मुंबईत आल्यानंतर वेलनकंडी अश्रफ यांनी एल. टी मार्ग पोलिसात तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी अमृत जयंती पटेल, सोनूभाई व इतर दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदविला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून पळून गेलेल्या आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page