व्यवयासात गुंतवणुकीसाठी घेतलेल्या तीस लाखांचा अपहार
वयोवृद्धाच्या तक्रारीवरुन महिलेसह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२२ मार्च २०२४
मुंबई, – व्यवसायात गुंतवणुकीसाठी घेतलेल्या सुमारे तीस लाखांचा अपहार करुन एका वयोवृद्धाची फसवणुक केल्याप्रकरणी एका महिलेसह दोघांविरुद्ध डी. बी मार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. निरव महेंद्र शहा आणि करिमा हसनअली लाडक अशी या दोघांची नावे असून यातील करिमा ही तक्रारदाराच्या सूनेची नातेवाईक असल्याचे पोलिसांनी सांगितले. तिनेच निरवच्या मदतीने ही फसवणुक केल्याचा आरोप आहे.
७२ वर्षांचे वयोवृद्ध तक्रारदार सद्रुद्दीन नुरुदिन तेजानी हे कफ परेड परिसरात राहत असून त्यांचा फॅन्सी शूजचा व्यवसाय होता. नोटबंदीनंतर त्यांनी त्यांचा व्यवसाय बंद केला होता. त्यांची सून अनिसा हिच्या नात्यातील करिमा लाडक हिने त्यांना फनशाला इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नावाची एक कंपनी असून या कंपनीचे कार्यालय ग्रॅटरोड येथील रॉक्सी सिनेमागृहाजवळ आहे. कंपनीचे निरव शहा हे संचालक असून याच कंपनीत ती पार्टनर म्हणून काम करते असे सांगितले होते. कोरोना काळात कंपनीची भायखळा येथील शाखा बंद झाली होती. ती पुन्हा सुरु करुन तिथे लहान मुलांना खेळण्यासाठी प्ले झोन चालू करणार आहे. त्यामुळे त्यांनी तिच्या कंपनीत गुंतवणुक करावी असा सल्ला दिला होता. त्यानंतर अनिसाने त्यांचा मुलगा समीरला ही माहिती सांगून गुंतवणुकीबाबत विचारणा केली होती. संपूर्ण प्रोजेक्टची माहितीसह घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर समीर आणि अनिसाने तिच्या कंपनीत गुंतवणुकीचा निर्णय घेतला होता. त्यानंतर ते त्यांच्या मुलासोबत कंपनीच्या कार्यालयात गेले होते. तिथेच करिमाने त्यांची ओळख संचालक असलेल्या निरव शहा याच्याशी करुन दिली होती. यावेळी या दोघांनी त्यांना किमान तीस लाखांची गुंतवणुक करणे अपेक्षित असल्याचे सांगितले होते. त्यांनीही त्यास होकार देत त्यांच्या कंपनीच्या नावाने टप्याटप्याने धनादेशद्वारे तीस लाख रुपये ट्रान्स्फर केले होते.
मार्च २०२१ रोजी त्यांच्यात पार्टनरशीप डिड झाली होती. त्यात किड्स इंटरटेनमेंट, स्पोर्टस फॅसिलिटीस रेस्टॉरंट आणि कॅफे अशा प्रकारच्या इतर व्यवसाय एकत्रित करण्याचे ठरले होते. या व्यवसायातून निरज शहा आणि करिमा यांना ६७ टक्के तर सद्रुद्दीन तेजानी यांना ३३ टक्के नफा देण्याचे ठरले होते. प्ले झोनसाठी त्यांना एका जागेची गरज होती. काही जागा पाहिल्यानंतर त्यांनी वरळीतील एक जागा घेण्याचा निर्णय घेतला होता. या जागेसाठी केअरटेकरला ७० लाख रुपये लाच स्वरुपात द्यावे लागतील असे निरव शहाने त्यांना सांगितले होते. मात्र याबाबत त्यांचे एकमत झाले नाही. लाच देण्यास त्यांनी नकार देत त्यांच्यासोबत व्यवसाय करायचा नाही असे सांगून कंपनीत गुंतवणुक केलेली रक्कम परत करण्याची विनंती केली होती. यावेळी निरवने ही रक्कम व्याजासहीत देण्याचे मान्य केले होते. जानेवारी ते एप्रिल २०२२ या कालावधीत त्याने त्यांना चार महिन्यांचे प्रत्येकी २५ हजार असे एक लाख रुपयाचे व्याज दिले होते. नंतर त्याने व्याजाची रक्कम देणे बंद केले. पैशांची मागणी केल्यानंतर या दोघांनी पैसे परत मिळणार नाही. तुम्हाला जे करायचे ते करा अशी धमकी दिली होती. त्यामुळे त्यांनी त्यांना त्यांच्या वकिलामार्फत नोटीस पाठविली होती. मात्र या नोटीसला त्यांनी उत्तर दिले नाही. गुंतवणुकीच्या नावाने या दोघांनी त्यांच्याकडून घेतलेल्या तीस लाखांचा अपहार करुन फसवणुक केली होती. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी डी. बी मार्ग पोलिसात तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर निरव शहा आणि करिमा लाडक या दोघांविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदविला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.