बिल्डरची पावणेदोन कोटीच्या फसवणुकीप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा

चाळीच्या पुर्नविकासासाठी घेतलेल्या पैशांचा अपहार केल्याचा आरोप

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१४ एप्रिल २०२४
मुंबई, – परळ परिसरातील एका नामांकित बिल्डरची सुमारे पावणेदोन कोटीची फसवणुक केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध भोईवाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. जयेश आजगावकर आणि हरविंदरसिंग बिंद्रा अशी या दोघांची नावे आहेत. चाळीच्या पुर्नविकासासाठी घेतलेल्या पैशांचा अपहार करुन फसवणुक केल्याचा या दोघांवर आरोप आहे. या दोघांची लवकरच पोलिसांकडून चौकशी होणार आहे.

राजेश काशिनाथ मिरगळ हे व्यवसायाने बिल्डर असून ते परळ परिसरात त्यांच्या कुटुंबियांसोबत राहतात. त्यांची समर्थ डेव्हलपर्स नावाची एक खाजगी कंपनी असून या कंपनीने मुंबईसह चिपळून येथे अनेक प्रोजेक्ट हाती घेतले होते. हरविंदरसिंग हा त्यांचा मित्र असून त्याची एक जाहिरात कंपनी आहे. त्यानेच त्यांची ओळख जयेश आजगावकरशी करुन दिली होती. सप्टेंबर २०२० रोजी त्यांची भेट झाली होती. या भेटीत जयेशने त्याला नॅशनल टेक्सटाईल्स मिलच्या जागेवर १२ चाळीच्या पुर्नविकासाचे काम मिळाले आहे. या कामासाठी त्याला सेटींग करण्यासाठी पैशांची गरज आहे. त्यामुळे त्याने त्यांना तीन कोटीची आर्थिक मदत करण्याची विनंती केली होती. या मोबदल्यात त्याने त्यांना बारापैकी दोन चाळीच्या पुर्नविकासाचे काम देण्याचे आश्‍वासन दिले होते. पुर्नविकास कामाचे कागदपत्रे दाखवून त्याने त्यांचा विश्‍वास संपादन केला होता. त्यामुळे त्यांनी त्याला तीन कोटी रुपये दिले होते. यावेळी त्याने ही रक्कम त्यांना पंधरा दिवसांत परत करण्याचे तसेच त्याला चाळीच्या पुर्नविकासाचे काम देण्याचे आश्‍वासन दिले होते. मात्र दिलेल्या मुदतीत त्याने पैसे परत केले नाही किंवा त्यांना पुर्नविकासाचे काम दिले नाही. त्यामुळे त्यांनी त्याच्याकडे पैशांसाठी तगादा लावला होता. वारंवार विचारणा केल्यानंतर जयेशने त्यांना सव्वाकोटी रुपये परत केले होते. मात्र उर्वरित पावणेदोन कोटीचा परस्पर अपहार करुन जयेश आणि हरविंदरसिंग यांनी त्यांची फसवणुक केली होती. हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी भोईवाडा पोलिसात तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर जयेश आणि हरविंदरसिंग या दोघांविरुद्घ पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page