चार महिलांना अटक तर तेरा अल्पवयीन मुलांची सुटका
अल्पवयीन मुलांना भिक मागण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
११ एप्रिल २०२४
मुंबई, – अल्पवयीन मुलांना भिक मागण्यास प्रवृत्त करणार्या चार महिलांना गुन्हे शाखेच्या विशेष बाल पोलीस पथकाच्या अधिकार्यांनी अटक केली. या कारवाईत पोलिसांनी तेरा बाल भिक्षेकर्यांची सुटका केली असून या सर्वांना मानखुर्द येथील काल कल्याण समिती सुधारगृहात पाठविण्यात आले आहे. दरम्यान अटकेनंतर या चारही महिलांना पुढील चौकशीसाठी बांगुरनगर पोलिसांकडे सोपविण्यात आले असून त्यांच्याविरुद्ध विविध कलमांतर्गत कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
मालाड येथील मढ-मार्वे रोड, मिठ चौकी जंक्शनजवळ काहीजण अल्पवयीन मुलांना जबदस्तीने भिक मागण्यास प्रवृत्त करत असल्याच्या काही तक्रार मुंबई पोलिसांना प्राप्त झाले होते. या तक्रारीची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत गुन्हे शाखेच्या विशेष बाल पोलीस पथकाला कारवाईचे आदेश दिले होते. या आदेशानंतर पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त लखमी गौतम, अतिरिक्त पोलीस आयुक्त शशीकुमार मीना, पोलीस उपायुक्त रागसुधा आर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन पोतदार, महिला पोलीस निरीक्षक अनिता कदम, महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक संगीता पाटील, महिला पोलीस शिपाई भोसले, तळेकर, बागल, बुधे, सोनकांबळे, विशेष बाल पोलीस युनिटचे पोलीस उपनिरीक्षक नंदकुमार कदम, सहाय्यक फौजदार कदम, महिला फौजदार मालवणकर, पोलीस हवालदार जेडगुळे, महिला पोलीस हवालदार रश्मी हळर्णकर, पोलीस हवालदार वाघमारे, महिला पोलीस शिपाई बेलोसे, दरोडे, गोडसे, पोलीस शिपाई मोरे, घुसे, यादव आणि शिंदे यांनी बुधवारी सकाळी साडेदहा वाजता एका विशेष मोहीमेतर्ंगत भिक मागणार्या तीन ते पंधरा वयागटातील तेरा मुलांची सुअका केली. या मुलांना भिक मागण्यास प्रवृत्त करुन त्यावर स्वतचा उदरनिर्वाह करणार्या चार महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. या चारही महिलांना नंतर बांगुरनगर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले होते. त्यांच्याविरुद्ध २४ बाल न्याय (काळजी व संरक्षण) अधिनियम २००० सहकलम ५, ९, ११ भिक्षेकरी प्रतिबंधक कायदा १९५२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच गुन्ह्यांत नंतर चारही महिलांना पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्यांना बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते.