अपहरण झालेल्या बारा वर्षांच्या अल्पवयीन मुलाची हत्या
एक महिन्यांपासून मिसिंग होता; अपहरणासह हत्येचा गुन्हा
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
५ मार्च २०२४
मुंबई, – अपहरण झालेल्या एका बारा वर्षांच्या अल्पवयीन मुलाची हत्या झाल्याची घटना वडाळा परिसरात उघडकीस आली आहे. संदीप असे या मृत मुलाचे नाव असून तो गेल्या एक महिन्यांपासून मिसिंग होता. याप्रकरणी वडाळा टी टी पोलिसांनी अपहरणासह हत्या आणि हत्येचा पुरावा नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. त्याचा मृतदेह सापडल्याने स्थानिक रहिवाशांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान या घटनेची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत आरोपींच्या अटकेसाठी स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेच्या अधिकार्यांना विशेष मोहीम हाती घेण्याचे आदेश दिले आहेत.
४९ वर्षांचे तक्रारदार त्याच्या पत्नी आणि संदीप नावाच्या बारा वर्षांच्या मुलासोबत वडाळा येथील मदिना मशिदीजवळील शांतीनगर परिसरात राहतो. याच परिसरातील संगमनगर येथे त्याचा मासे विक्रीचा व्यवसाय आहे. त्याचा मुलगा संदीप हा आदर्श स्कूलमध्ये सहावीत शिकत होता. त्याच्या शाळेची वेळ दुपारी साडेबारा ते साडेपाच अशी होती. अनेकदा त्याची पत्नी संदीपला शाळेत सोडण्यासाठी आणि आणण्यासाठी जात होती. २८ जानेवारीला शाळेला सुट्टी असल्याने संदीप हा घरातच होता. रात्री सव्वाआठ वाजता बाहेर जातो असे सांगून संदीप निघून गेला. मात्र बराच वेळ झाल्यानंतर तो घरी परत आला नाही. त्यामुळे त्याच्या आई-वडिलांनी त्याचा शोध सुरु केला होता. सर्वत्र शोध घेतल्यानंतर संदीप कुठेच सापडला नाही. त्यामुळे त्यांनी वडाळा टी टी पोलीस ठाण्यात संदीपच्या मिसिंगची तक्रार केली होती. या तक्रारीची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा नोंदवून त्याचा शोध सुरु केला होता.
मात्र आठवडाभर शोध घेऊन संदीप कुठेच सापडला नाही. त्यामुळे पोलिसांनी परिसरातील सीसीटिव्ही फुटेजच्या मदतीने त्याचा शोध सुरु केला होता. मात्र फुटेजवरुन पोलिसांना काहीही सुगावा लागला नाही. ही शोधमोहीम सुरु असतानाच तब्बल एक महिना सहा दिवसांनी संदीपचा मृतदेह वडाळा येथील एका निर्जनस्थळी पोलिसांना सापडला. त्याचा मृतदेह त्याच्या पालकांना दाखविला असता त्यांनी तो मृतदेह त्यांच्याच मुलाचा असल्याचे ओळखले होते. त्यानंतर पंचनामा करुन पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी जवळच्या शासकीय हॉस्पिटलमध्ये पाठविला आहे. शवविच्छेदन अहवालानंतर संदीपच्या मृत्यूचे अधिकृत कारण समजू शकणार आहे. प्राथमिक तपासात संदीपची हत्या झाल्याचे उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी आता अपहरणासह हत्येसह हत्येचा पुरावा नष्ट केल्याप्रकरणी कलम वाढविले आहे.
दरम्यान या घटनेची वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी गंभीर दखल घेत वडाळा टीटी पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले होते. त्यामुळे पोलिसांचे तीन ते चार पथक आरोपींच्या अटकेसाठी विविध ठिकाणी रवाना झाले आहे. अंतर्गत वादातून संदीपचे अपहरण करुन नंतर त्याची हत्या करण्यात आली असावी असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.