दिड वर्षांच्या मुलाच्या साडेचार लाखांमध्ये विक्रीचा पर्दाफाश
तीन महिला, एक तृतीयपंथीसह सहाजणांना अटक व कोठडी
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२७ मे २०२४
मुंबई, – शूटींगसाठी घेऊन गेलेल्या एका दिड वर्षांच्या लहान मुलाची साडेचार लाखांमध्ये खरेदी-विक्री करणार्या एका टोळीचा डी. एन नगर पोलिसांनी पर्दाफाश केला. याप्रकरणी तीन महिला, तृतीयपंथीसह सहा आरोपींना वेगवेगळ्या ठिकाणाहून पोलिसांनी अटक केली. नजमीन मोहम्मद आझाद शेख, मोहम्मद आझाद अबुल शेख, साकिनाबानो शकील शेख, राबिया इस्लामअली अन्सारी, सायबा सफुद्दीन अन्सारी आणि इंद्रदीप ऊर्फ इंदर हरिराम मेहरवाल अशी या सहाजणांची नावे आहेत. अटकेनंतर या सहाजणांना अंधेरीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना गुरुवार ३० मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. विक्री केलेल्या मुलाची सुखरुप सुटका करण्यात आली असून त्याला त्याच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
यातील तक्रारदार महिला तिच्या पती आणि तीन मुलांसोबत मालाडच्या मालवणी परिसरात राहते. तिचा लहान मुलगा दिड वर्षांचा आहे. एप्रिल महिन्यांत तिची साकिनासोबत ओळख झाली होती. या ओळखीनंतर त्या दोघीही चांगल्या मैत्रिण झाल्या होत्या. याच दरम्यान सकिनाने तिला साबियाविषयी माहिती दिली होती. साबिया ही सिनेसृष्टीशी संबंधित असून तिला विविध मालिकांसह चित्रपटासाठी लहान मुलांची गरज लागते. या मुलांना शूटींगसाठी चांगले पैसे मिळतात. त्यामुळे तिने तिच्या दिड वर्षांच्या मुलाला शूटींगसाठी पाठविल्यास तिला चांगले पैसे मिळतील असे सांगितले. पैसे मिळत असल्याने तिनेही त्यास होकार दिला होता. सकिनावर विश्वास ठेवून तिने तिला दिड वर्षांच्या मुलाला सोपविले होते. काही दिवसांनी सकिनाचा तिला पुन्हा फोन आला. शूटींगचे काम अद्याप बाकी असून दहा दिवसांनी मुलाला घरी आणून सोडते असे सांगितले. यावेळी तिने तिला आणखीन २५ हजार रुपये दिले होते. मात्र दहा ते पंधरा दिवस उलटूनही सकिना तिच्या मुलाला घेऊन आली नाही. हा प्रकार संशयास्पद वाटताच तिने तिला कॉल केला, मात्र तिने तिला प्रतिसाद दिला नाही. कॉल घेतल्यानंतर ती तिला उडवाउडवीचे उत्तरे देत होती. त्यामुळे तिने तिची चौकशी सुरु केली होती. यावेळी तिला सकिनाने तिच्या मुलाला अंधेरी येथे एका जोडप्याला विकल्याचे समजले. मुलाचा खरेदी-विक्रीचा व्यवहार अंधेरीतील इंदिरानगर परिसरात झाला होता. त्यामुळे तिने वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मच्छिंदर यांची भेट घेऊन त्यांना घडलेला प्रकार सांगितला. या तक्रारीची त्यांनी गंभीर दखल घेत गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले होते.
या आदेशानंतर पोलीस उपायुक्त राज तिलक, सहाय्यक पोलीस आयुक्त मृत्यूजय हिरेमठ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मच्छिंदर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक देसाले, महिला पोलीस उपनिरीक्षक सिमा खान, महिला पोलीस हवालदार स्मिता पेडणेकर, पोलीस हवालदार गोविंद पवार, पोलीस शिपाई वारे, लाडे यांनी तपास सुरु केला होता. सकिनाचा शोध सुरु असताना या पथकाने वेगवेगळ्या परिसरातून सहाजणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यांच्या चौकशीत त्यांनी या मुलाची अंधेरी येथे राहणार्या समलिंगी जोडप्याला ४ लाख ६५ हजारामध्ये विक्री केल्याचे उघडकीस आले. राबिया आणि इंदरदिपकडे या मुलाला स्वाधीन केल्यानंतर त्यांनी इतर आरोपींच्या मदतीने त्याची विक्री केली होती. त्यानंतर या जोडप्याकडून पोलिसांनी मुलाची सुखरुप सुटका केली. त्याला नंतर त्याच्या पालकांकडे सोपविण्यात आले. आरोपी जोडपे सुस्थिती असून त्यांनी मुलाला दत्तक घेण्याची सर्व कायदेशीर प्रकिया सुरु केली होती. मात्र कागदपत्रांची पूर्तता न झाल्याने त्यांना ते मूल दत्तक घेता आले नाही.
चौकशीतून आलेल्या माहितीनंतर या सहाजणांविरुद्ध ३७०, ३४ भादवी कलमांतर्गत ८०, ८१ जे. जे कायदा कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच सहाही आरोपींना अटक केली. अटकेनंतर त्यांना सोमवारी दुपारी अंधेरीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना गुरुवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या टोळीने अशाच प्रकारे इतर काही मुलांची खरेदी-विक्री केली आहे का याचा पोलीस तपास करत आहेत. गुन्हा दाखल होताच अवघ्या काही तासांत या टोळीचा पर्दाफाश करुन सहा आरोपींना अटक करणार्या वरिष्ठ पोलीस राजेंद्र मच्छिंदर यांच्यासह त्यांच्या पथकाचे वरिष्ठांकडून कौतुक केले.