सरोगसीच्या माध्यमातून नवजात बालकांची विक्रीप्रकरणी सातजणांना अटक
आंतरराज्य टोळी असल्याचे उघड; चौदा मुलांची विक्री केल्याची कबुली
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२८ मार्च २०२४
मुंबई, – आर्थिक परिस्थितीचा गैरफायदा घेऊन काही महिलांना सरोगसीसाठी प्रवृत्त करुन त्यांच्या नवजात बालकांची विक्री करणार्या एका आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश करण्यात गुन्हे शाखेला यश आले आहे. याच गुन्ह्यांत एका डॉक्टर, चार महिलांसह सातजणांना वेगवेगळ्या परिसरातून पोलिसांनी अटक केली आहे. डॉ. संजय सोपानराव खंदारे, वंदना अमीत पवार, शीतल गणेश वारे, स्नेहा युवराज सूर्यवंशी, नसीमा हनीफ खान, लता नानाभाऊ सुरवाडे आणि शरद मारुती देवर अशी या सहाजणांची नावे आहेत. अटकेनंतर या सर्व आरोपींना पोलीस बंदोबस्तात किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या टोळीने मुंबईसह महाराष्ट्र, आंध्रप्रदेश आणि तेलंगणा राज्यात चौदाहून लहान मुलांची विक्री केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. या मुलांसह त्यांच्या पालकांची माहिती काढण्याचे काम सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.
विक्रोळीतील कन्नमवारनगर परिसरात कांता पेडणेकर ही महिला असून १३ डिसेंबर २०२२ रोजी तिच्या पाच महिन्यांचे बाळाचे शितल वारे या महिलेने विक्री केली होती अशी माहिती मिळाली होती. या माहितीनंतर पोलिसांनी शीतलचा शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना तिला गोवंडी परिसरातून पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीत तिने कांता पेडणेकर हिच्या बाळाचे डॉ. संजय खंदारे (बीएचएमएस) व वंदना पवार यांच्या मदतीने विक्री केली होती. या बाळाला नंतर रत्नागिरी येथे राहणार्या संजय गणपत पवार आणि सविता संजय पवार यांना विक्री करण्यात आली होती. त्यासाठी त्यांच्याकडून त्यांनी दोन लाख रुपये घेतले होते. हा प्रकार उघडकीस येताच विक्रोळी पोलिसांनी संबंधित आरोपीविरुद्ध भादवीसह अल्पवयीन न्याय (मुलांची काळजी आणि संरक्षण) कायदा कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यांचा तपास नंतर गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला होता. हा तपास हाती येताच शितलसह तिचा एजंट सहकारी शरद देवर आणि स्नेहा सूर्यवंशी या तिघांना पोलिसांनी अटक केली. यावेळी या तिघांनी अन्य एका दोन वर्षांच्या मुलीची अडीच लाखांना विक्री केल्याचे उघडकीस आले. ती मुलगी त्यांनी लिलेंद्र देजू शेट्टी यांना विकले होते. त्यानंतर या पथकाने रत्नागिरीच्या गुहागर आणि लिंलेद्र शेट्टी यांच्याकडील दोन्ही मुलांना ताब्यात घेतले होते. या दोघांनाही नंतर महालक्ष्मीच्या बाल आशा ट्रस्टमध्ये ठेवण्यात आले असून तिथे त्यांची योग्य ती काळजी घेतली जात आहे.
या गुन्ह्यांत डॉ. संजय खंदारे आणि वंदना पवार आणि नसीमा खान यांचा सहभाग उघडकीस आला होता. त्यानंतर या तिघांनाही वेगवेगळ्या परिसरातून पोलिसांनी अटक केली. संबंधित आरोपी फर्टिलिटी एजंट म्हणून काम करतात. त्यामुळे त्यांचा विविध हॉस्पिटलशी संपर्क येतो. यावेळी हॉस्पिटलमध्ये येणार्या कुटुंबांसह त्यांच्या आर्थिक परिस्थितीची माहिती काढून त्यांना पैशांचे आमिष दाखवून त्यांचे नवजात बालकांची विक्री करुन स्वतचा आर्थिक फायदा करुन घेत होते. बाळाची विक्री करणारी ही एक आंतरराज्य टोळी असून या टोळीने आतापर्यंत मुंबईसह महाराष्ट्र, तेलंगणा आणि आंध्रप्रदेशात पाच दिवस ते नऊ वयोगटातील चौदाहून बाळांची विक्री केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. त्यापैकी अकरा मुले आणि तीन मुलींचा समावेश आहे. या चौदापैकी दोन मुलांची सुटका करण्यात आली आहे. यातील डॉ. संजय खंदारे हा मूळचा नांदेडचा रहिवाशी असून तो सध्या दिवा येथे राहतो. त्याचे एक खाजगी क्लिनिक असून या कटाचा प्रमुख आरोपी आहे. त्याच्या संपर्कात काही पालक होते, त्यांनी त्याच्या मदतीने त्यांच्या बाळाची विक्री केली असावी असा पोलिसांचा अंदाज आहे. तेलंगणा राज्यात नवजात बालकांची प्रचंड मागणी असून त्यासाठी संबंधित आरोपींना मोठी रक्कम मिळत होती. त्यामुळे त्यांनी बहुतांश बालकांची तेलंगणा राज्यात विक्री केल्याचे बोलले जाते.
अटकेनंतर आरोपींना किल्ला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. चौकशीत वंदना ही उपचारासाठी डॉ. संजय खंदारे याच्याकडे आली होती. तिने बाळाविषयी चौकशी केल्यानंतर त्याने तिची ओळख शीतलशी करुन दिली होती. ज्या महिलांची आर्थिक परिस्थिती चांगली नाही. अशा महिलांची माहिती काढून त्यांना सरोगसीसाठी तयार करुन पैशांचे आमिष दाखविले जात होते. यातील नसीमाला अशाच प्रकारे तयार करुन तिला दहा हजार रुपये कमिशन देण्यात आले होते. पैशांसाठी तीदेखील तयार झाली होती. ही टोळी सोशल मिडीयावर एकमेकांशी संपर्क साधताना कोड वर्डचा वापर करत होते. कोणाला संशय येऊ नये म्हणून एम आणि एफ या शब्दाचा वापर केले होते. एम म्हणजे मुलगा आणि एफ म्हणजे मुलगी असा त्याचा अर्थ होता. या मुलांची ही टोळी एक ते चार लाखांमध्ये विक्री करत होते. पोलीस कोठडीत असलेल्या या सातही आरोपींची पोलिसांकडून कसून चौकशी सुरु आहे. त्यांनी विक्री केलेल्या इतर मुलांचा शोध सुरु आहे. या कटात काही क्लिनिक, हॉस्पिटलच्या डॉक्टरसह वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचार्यांचा सहभाग आहे का याचाही पोलीस तपास करत आहेत. ठाण्यातील दोन हॉस्पिटल गुन्हे शाखेच्या रडारवर आहे. सरोगसीसाठी याच हॉस्पिटलमध्ये काही महिलांना नेण्यात आले होते असे तपासात उघडकीस आले आहे.
ही कामगिरी पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त लखमी गौतम, अतिरिक्त पोलीस आयुक्त शशीकुमार मीना, पोलीस उपायुक्त रागासुधा, दत्ता नलावडे, सहाय्यक पोलीस आयुक्त दत्तात्रय नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट दोनचे प्रभारी पोलीस निरीक्षक दिलीप तेजनकर, महिला पोलीस निरीक्षक भोर, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश शेलार, महिला पोलीस उपनिरीक्षक शीतल पाटील, पोलीस उपनिरीक्षक संजय भावे, सहाय्यक फौजदार निंबाळकर, घाटोळ, पोलीस हवालदार जगदाळे, राणे, साळुंखे, पाडवी, थिटमे, कांबळे, हरड, महिला पोलीस हवालदार तांबे, महिला पोलीस शिपाई शिंदे, पोलीस शिपाई सपकाळ, सय्यद, आव्हाड आणि पाटील यांनी केली.