आर्थिक वादातून ३३ वर्षांच्या व्यावसायिकाचे अपहरण

पुण्यातून तिन्ही अपहरणकर्त्यांना अटक तर व्यावसायिकाची सुटका

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२२ जुलै २०२४
मुंबई, – सुमारे तीस लाखांच्या सुरु असलेल्या आर्थिक वादातून हेमंतकुमार रावल या ३३ वर्षांच्या कापड व्यावसायिकाची चारजणांच्या टोळीने चिराबाजार येथून अपहरण केल्याची घटना घडली. याप्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल होताच अवघ्या बारा तासांत कुठलाही पुरावा नसताना एल. टी मार्ग पोलिसांनी पळून गेलेल्या तिन्ही अपहरणकर्त्यांना अटक करुन अपहरण केलेल्या व्यावसायिकाची सुखरुप सुटका केली. कपूरराम घांची ऊर्फ भाटी, गणेश पलटू पात्रा आणि प्रकाश दिपक पवार अशी या तिघांची नावे असून ते तिघेही पुण्याच्य कोंढवा, बिबवेवाडी आणि हडपसरचे रहिवाशी आहेत. या तिघांकडून पोलिसांनी गुन्ह्यांतील कार जप्त केली आहे. अटकेनंतर या तिघांनाही किल्ला कोर्टाने गुरुवार २५ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत इतर तिघांचा सहभाग उघडकीस आला असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

हेमंतकुमार रावल हा अहमदाबादचा रहिवाशी असून पूर्वी तो कपड्याच्या दुकानात दलालीचे काम करत होता. नंतर त्याने स्वतचा व्यवसाय सुरु केला होता. कपूररामसोबत ओळख असल्याने त्यांनी पार्टनरशीपमध्ये त्यांच्या व्यवसायाला सुरुवात केली होती. हेमंतकुमार पुण्यातून तर कपूराम हा गुजरात येथून कपडे आणून त्याची विक्री करत होते. या व्यवहारात कपूररामला हेमंतकुमार यांच्याकडून तीस लाख रुपये देणे बाकी होते. मात्र आर्थिक अडचणीमुळे त्यांना त्याला पैसे परत करता येत नव्हते. त्यामुळे त्यांच्यात काही दिवसांपासून वाद सुरु होता. त्यातूनच कपूररामने त्यांच्या मित्रांच्या मदतीने त्याच्या अपहरणाची योजना बनविली होती. रविवारी हेमंतकुमार व त्याचा मित्र कार्तिक सिंग राठोड हे चिराबाजार येथील बारमध्ये बसले होते. बारमधून बाहेर आल्यानंतर चारजणांच्या एका टोळीने हेमंतकुमार यांचे अपहरण केले होते. एका खाजगी कारमध्ये त्यांना पुण्याच्या दिशेने नेण्यात आले होते. या घटनेनंतर कार्तिक राठोडने मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुमला घडलेला प्रकार सांगितला. कंट्रोल रुममधून ही माहिती प्राप्त होताच एल. टी मार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी कार्तिक राठोड याच्या तक्रारीवरुन पोलिसांनी चारही आरोपीविरुद्ध १४० (३), ११५ (२), ६१ (२), १८९ (२), ३ (५) भारतीय न्याय सहिता अन्वये गुन्हा दाखल केला होता.

कारच्या मिळालेल्या प्राथमिक माहितीवरुन पोलिसांनी अपहरणकर्त्यांचा शोध सुरु केला होता. सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरुन ही कार पुण्याला गेल्याची माहिती पोलिसांना समजली होती. त्यानंतर अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. अभिनव देशमुख, पोलीस उपायुक्त डॉ. मोहितकुमार गर्ग, वरिष्ठ पेालीस निरीक्षक ज्ञानेश्‍वर वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बाळकृष्ण घाडीगावकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल भंडारे, विकास पाटील, पोलीस उपनिरीक्षक कांबळे, गायकवाड, वायाळ, पोलीस हवालदार परुळेकर, मुन्ना सिंग, सानप, तळेकर, पोलीस शिपाई वाकचौरे, वाकसे, जोशी, शिंदे, भामरे आदींचे एक पथक पुण्याला पाठविण्यात आले होते. या पथकाने पुण्यातील कोंढवा परिसरातील एका फ्लॅटमध्ये छापा टाकून तीन अपहरणकर्त्यांना अटक केली. त्यांच्या तावडीतून हेमंतकुमार रावल यांची सुखरुप सुटका केली. अटकेनंतर या तिघांनाही पुढील चौकशीसाठी मुंबईत आणण्यात आले होते. यातील कपूरराम हा पुण्याच्या कोंढवा परिसरात राहत असून त्याचा तिथे कपड्याचे दुकान आहे. गणेश हा हडपसरचा रहिवाशी असून त्याचा फुलांचा स्टॉल आहे तर प्रकाश हा बिबवेवाडीचा रहिवाशी असून त्याचा मोबाईल रिपेरिंगचा व्यवसाय असल्याचे पोलिसांनी सागितले.

याच गुन्ह्यांत अटक केल्यांनतर सोमवारी दुपारी त्यांना किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळ कोर्टाने त्यांना गुरुवार २५ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत इतर तिघांचा सहभाग उघडकीस आला असून त्यांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. आर्थिक वादातून या टोळीने हेमंतकुमार रावल यांचे अपहरण केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page