मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
12 ऑक्टोंबर 2025
मुंबई, – गार्डनमध्ये पाणी देण्यासाठी आलेल्या पाण्याच्या टँकरची धडक लागून झालेल्या अपघातात अर्जुन गोविंदा क्षीरसागर या 37 वर्षांच्या साईट सुपरवायझरचा मृत्यू झाला. अपघातानंतर टँकरचालक घटनास्थळाहून पळून गेला होता. त्यामुळे आरोपी टँकरचालकाविरुद्ध चुन्नाभट्टी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. हा अपघात गुरुवारी रात्री दिड वाजता चुन्नाभट्टी येथील बीकेसी कनेक्टरजवळील सोमय्या हॉस्पिटलसमोर झाला.
दिपाली अर्जुन क्षीरसागर ही महिला डोबिवली येथे राहते. तिचे पती अर्जुन हे आरपीएस इंन्फ्रा कंपनीत साईट सुपरवायझर म्हणून काम करत होते. सध्या या कंपनीचे काम चुन्नाभट्टीच्या बीकेसी कनेक्टर पुलाखाली, सोमय्या हॉस्पिटलसमोर सुरु आहे. त्यामुळे त्यांना तिथे सुपरवायझर म्हणून ठेवण्यात आले होते. बुधवारी रात्री नाईट शिफ्ट असल्याने ते घरातून नऊ वाजता चुन्नाभट्टी येथील साईटवर निघून गेले होते. रात्री दिड वाजता तिथे पायलिंगचे काम सुरु होते.
याच दरम्यान परिसरातील गार्डनला पाणी देण्यासाठी एक पाण्याचा टॅकर आला होता. टँकरचालक झाडांना पाणी देण्यासाठी टँकर पुढे-मागे नेत होता. यावेळी टँकरची धडक लागून अर्जुन हे जखमी झाले होते. टँकरच्या चाकाखाली आल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. हा प्रकार तिथे उपस्थित कर्मचार्यांच्या निदर्शनास येताच त्यांनी जखमी झालेल्या गोविंदा यांना तातडीने सायन हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तिथे त्यांना डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.
अपघाताची माहिती मिळताच चुन्नाभट्टी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. तोपर्यंत ही माहिती नंतर दिपालीला साईट इंजिनिअर प्रियांश जैन यांनी दिली होती. त्यामुळे ती सायन हॉस्पिटलमध्ये आली होती. तिथे गेल्यानंतर तिला अपघाताची माहिती समजली. तिच्या तक्रारीनंतर पोलिसांनी चालकाविरुद्ध हलगर्जीपणाने टँकर चालवून अर्जुन यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. अपघातानंतर चालक जखमी गोविंदा यांना वैद्यकीय मदत किंवा अपघाताची माहिती पोलिसांना न देता पळून गेला होता. त्यामुळे त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.