मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
३ ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – चर्चगेट रेल्वे स्थानकातील फुटपाथवर पालकांसोबत झोपलेल्या एका एक वर्षांच्या मुलीचे अपहरण करुन तिला घेऊन जयपूरला पळून गेलेल्या २३ वर्षांच्या महिलेस अखेर गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी अटक केली. पायल ऊर्फ प्रिती लक्ष्मणसिंग राजपूत असे या महिलेचे नाव असून ती मूळची जयपूरची रहिवाशी आहे. ट्रॉन्झिंट रिमांडवरुन मुंबईत आणल्यानंतर तिला पुढील चौकशीसाठी मरिनड्राईव्ह पोलिसांकडे सोपविण्यात आले तर अपहरण झालेल्या मुलीला तिच्या पालकांकडे सोपविण्यात आल्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक रोहिनी पोतदार यांनी सांगितले. एक महिन्यांत या अपहरणाचा पर्दाफाश करुन गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी आरोपी महिलेस अटक करुन तिच्या तावडीतून मुलीची सुखरुप सुटका केली, या पोलीस पथकाचे वरिष्ठांकडून कौतुक करण्यात आले.
तक्रारदार महिला तिच्या पती आणि एक वर्षांच्या ऐश्वर्या या मुलीसोबत चर्चगेट रेल्वे स्थानकातील फुटपाथवर राहते. १० सप्टेंबरला ती रेल्वे स्थानकाबाहेरील फुटपाथवर तिच्या पती आणि मुलीसोबत झोपली होती. रात्री उशिरा एक ते पहाटे चारच्या दरम्यान एका अज्ञात महिलेने तिच्या मुलीचे अपहरण केले होते. हा प्रकार सकाळी उघडकीस येताच मुलीच्या आई-वडिलांनी तिचा सर्वत्र शोध घेतला, मात्र ती कुठेच सापडली नाही. त्यामुळे तिच्या पालकांनी मरिनड्राईव्ह पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला होता. रेल्वे स्थानकासह परिसरातील सीसीटिव्ही फुटेजची पाहणी केल्यानंतर एक महिला मुलीला घेऊन जात असल्याचे दिसून आले होते. ही महिला नंतर जयपूरला पळून गेली होती. त्यामुळे मरिनड्राईव्ह पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी या महिलेचा शोध सुरु केला होता.
तिच्या अटकेसाठी पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त लखमी गौतम, अतिरिक्त पोलीस आयुक्त शशीकुमार मीना, पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे, सहाय्यक पोलीस आयुक्त नळे, प्रभारी पोलीस निरीक्षक रोहिनी लक्ष्मण पोतदार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गावडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक तावडे, पोलीस उपनिरीक्षक हिंगीनाळे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शेडगे, देसाई, पोलीस हवालदार शिंदे, घुगे, भाडळे, लोखंडे, खेडकर, तुपे, निमासे, सकट गायकवाड, वर्हाडी, जाधव, माने, निंबाळकर, तुपे आदीचे एक पथक जयपूरला पाठविण्यात आले होते. या पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने विधायकपूर पोलीस ठाण्याच्या एटीएम सेंटरजवळील फुटपाथवरुन पायल ऊर्फ प्रितीला ताब्यात घेतले. तिच्याकडील मुलीची चौकशी केल्यानंतर तिने या मुलीचे अपहरण केल्याची कबुली दिली.
या कबुलीनंतर तिला ट्रान्झिंट रिमांडवर पुढील चौकशीसाठी मुंबईत आणण्यात आले होते. त्यानंतर तिला अपहरणाच्या गुन्ह्यांत अटक करुन पुढील कारवाईसाठी मरिनड्राईव्ह पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले तर अपहरण झालेल्या मुलीला तिच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. एक महिन्यानंतर मुलगी सुखरुप सापडल्याने तिच्या पालकांनी प्रभारी पोलीस निरीक्षक रोहिनी पोतदार यांच्यासह त्यांच्या पथकाचे आभार व्यक्त केले आहे.