टाटा गार्डनमध्ये 55 वर्षाच्या व्यक्तीची दगडाने ठेचून हत्या

हत्येनंतर अज्ञात मारेकर्‍याचे घटनास्थळाहून पलायन

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
5 एप्रिल 2026
मुंबई, – चर्चगेट येथील वीर नरिमन रोड, टाटा गार्डनमध्ये राहुल पंजवानी ऊर्फ पंजाबी या 55 वर्षांच्या व्यक्तीची अज्ञात मारेकर्‍याने दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या हत्येमागील कारणाचा खुलासा होऊ शकला नाही, मात्र या हत्येमागे राहुलच्या परिचित व्यक्तीचा सहभाग असावा असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. याप्रकरणी आझाद मैदान पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून पळून गेलेल्या अज्ञात मारेकर्‍याचा शोध सुरु केला आहे.

जनार्दन रामचंद्र जाधव हे कुलाबा येथील पोलीस वसाहतीत राहत असून मुंबई पोलीस दलात पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत आहे. सध्या त्यांची नेमणूक आझाद मैदान पोलीस ठाण्यात आहे. शनिवारी ते दिवसपाळीवर कर्तव्य बजावत होते. सायंकाळी पाच वाजता त्यांना मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुममधून चर्चगेट येथील वीर नरिमन रोड, बसडेपोजवळील टाटा गार्डनच्या आतमध्ये एक व्यक्ती रक्ताच्या थारोळ्यात पडल्याची माहिती प्राप्त झाली होती. या माहितीनंतर जनार्दन जाधव हे त्यांच्या पोलीस टिमसह घटनास्थळी रवाना झाले होते.

घटनास्थळी पोलिसांना एका 50 ते 55 वयोगटातील व्यक्ती रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे सिून आले. त्यामुळे त्याला तातडीने जवळच्या शासकीय हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. प्राथमिक तपासात मृत व्यक्तीचे नाव राहुल पंजवानी ऊर्फ पंजाबी असल्याचे उघडकीस आले. त्याची अज्ञात व्यक्तीने दगडाने ठेचून हत्या केली होती. त्याची हत्या करुन मारेकरी पळून गेला होता. त्याचा मृतदेह नंतर शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला होता.

राहुलची हत्या झाल्याचे उघडकीस येताच आझाद मैदान पोलिसांनी अज्ञात मारेकर्‍याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. या हत्येमागील कारणाचा खुलासा होऊ शकला नाही, मात्र राहुलची त्याच्याच परिचित मारेकर्‍याने हत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे. परिसरातील सीसीटिव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून या फुटेजवरुन पळून गेलेल्या मारेकर्‍याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page