मुख्यमंत्री कोट्यातील फ्लॅट-गाळा देण्याच्या आमिषाने फसवणुक

पाच महिन्यांपासून वॉण्टेड असलेल्या मुख्य आरोपीस अटक

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
8 जुलै 2025
मुंबई, – मुख्यमंत्री कोट्यातील म्हाडाचे फ्लॅट आणि व्यावसायिक गाळे स्वस्तात देण्याचे आमिष दाखवून एका महिलेची सुमारे 27 लाखांची फसवणुक करुन पळून गेलेल्या एका वॉण्टेड आरोपीस पाच महिन्यानंतर दहिसर पोलिसांनी अटक केली. राज हिरालाल शहा असे या आरोपीचे नाव असून फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत आहे. त्याच्या चौकशीतून त्याने अशाच प्रकारे अनेक लोकांकडून म्हाडाच्या फ्लॅट आणि गाळ्यासाठी लाखो रुपये घेऊन त्यांची फसवणुक केल्याचे उघडकीस आले आहे. त्याच्या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे करण्यात पोलिसांना यश आले आहे.

शिल्पा ध्रुव कोंडेकर ही महिला बोरिवलीतील मागाठाणे परिसरात राहते. तिचे पती फोर्ट परिसरातील एका खाजगी कंपनीत आयटी मॅनेजर म्हणून काम करतात. तिचे प्रमोद दत्तात्रय बलकावडे हे सख्खे मामा असून त्यांचे मार्च 2024 रोजी निधन झाले आहेत. 28 नोव्हेंबर 2020 रोजी त्यांच्या मुलीचे लग्न झाले होते. या लग्नानिमित्त शिल्पा ही त्यांच्या घरी गेली होती. यावेळी तिच्या मामांनी तिला कांदिवलीतील महावीरनगर, मागाठाणे येथे मुख्यमंत्री कोट्यातून म्हाडाचे स्वस्तात फ्लॅट देण्याबाबत चर्चा केली होती. त्यासाठी त्यांचा मित्र राज शहा हा त्यांना मदत करत असल्याचे सांगितले होते.

याच दरम्यान त्यांनी त्यांना मागाठाणे येथील फ्लॅटसह कांदिवलीतील चारकोप परिसरातील म्हाडाचे काही व्यावसायिक गाळे दाखविले होते. यावेळी तिच्या पतीने चारकोप येथील व्यावसायिक गाळा खरेदीसाठी आपण इच्छुक असल्याचे सांगितले होते. याच दरम्यान प्रमोद बलकावडे यांनी वयोवृद्धासाठी मुख्यमंत्री कोट्यातून विशेष सवलत आहे. त्यामुळे तिला तिच्या आईसह सासूच्या नावाने स्वस्तात म्हाडा फ्लॅट बुक करण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे तिने सासू अंजीरा गंगाराम कोंडेकर आणि आई निर्मला दौलत तुरडे यांच्या नावाने म्हाडाचे दोन फ्लॅट घेण्याचा निर्णय घेतला होता. डिसेंबर 2020 रोजी त्यांची प्रमोद यांनी राज शहाशी ओळख करुन दिली होती. यावेळी त्यांच्या म्हाडाच्या फ्लॅटसह व्यावसायिक गाळ्याबाबत सविस्तर चर्चा झाली होती.

यावेळी राज शहाने त्याने वितरीत केलेल्या म्हाडा फ्लॅट आणि गाळ्याची लिस्ट दाखवून त्यांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे त्यांनी दोन फ्लॅटसह एका गाळ्यासाठी त्याला प्रत्येकी तीनप्रमाणे नऊ आगाऊ दिले होते. त्यानंतर राजने तिच्या सासूसह आईच्या नावाने मुख्यमंत्र्यांच्या नावाने म्हाडा फ्लॅटसाठी अर्ज केल्याचे पत्र तयार केले होते. ते पत्र त्याने संबंधित विभागात पाठविले आहे असे सांगून त्यांना ओटीपी क्रमांक दिला होता. 25 नोव्हेंबर 2020 ते 24 जून 2024 या कालावधीत तिने फ्लॅट आणि गाळ्यासाठी प्रमोद बलकावडे व राज शहा याला टप्याटप्याने 27 लाख रपुये दिले होते. मात्र मुदतीत त्याने त्यांना फ्लॅट व गाळ्याचे दस्तावेज तसेच ताबा दिला नाही. फ्लॅट-गाळा वाटपाची प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली आहे, लवकरच शिल्लक कोट्यातील यादी, फ्लॅट वाटप नियमावली आणि रजिस्ट्रेशन होणार असल्याचे सांगून राज शहा यांना विविध कारण सांगून टाळत होता.

ऑक्टोंबर 2021 रोजी राजने सरकारला बदलल्याने त्यांना पुन्हा नव्याने मुख्यमंत्री कोट्यातील म्हाडा फ्लॅटसाठी अर्ज करावे लागतील असे सांगितले. त्यामुळे त्यांनी पुन्हा फ्लॅटसाठी अर्ज केले होते. मात्र यावेळेस त्याने दिलेल्या मुदतीत फ्लॅट गाळ्याचा ताबा दिला नाही किंवा दस्तावेज दिले नाही. त्यामुळे तिने राज शहाच्या बोरिवलीतील गणपत नगरात जाऊन चौकशी सुरु केली होती, मात्र तिथे तो राहत नसल्याचे तिला समजले. राजने अशाच प्रकारे अनेकांकडून मुख्यमंत्री कोट्यातील म्हाडा फ्लॅट आणि गाळा स्वस्तात देतो असे सांगून पैसे घेतले होते. मात्र कोणालाही फ्लॅट आणि गाळ्याचा ताबा दिला नाही. त्यांची फसवणुक करुन तो पळून गेला होता. हा प्रकार लक्षात येताच शिल्पा कोंडेकर हिने तिचा मामा प्रमोद बलकावडे आणि राज शहा यांच्याविरुद्ध दहिसर पोलिसांत तक्रार केली होती.

या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर बोगस दस्तावेज बनवून सुमारे 27 लाखांचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत पळून गेलेल्या राजचा पोलिसांकडून शोध सुरु होता. राज हा गेल्या पाच महिन्यांपासून फरार होता. अखेर त्याला दोन दिवसांपूर्वी दहिसर पोलिसांच्या एका विशेष पथकाने अटक केली. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. प्राथमिक तपासात राज शहाने अनेकांना फ्लॅट आणि गाळ्याच्या नावाने गंडा घातला असून फसवणुकीचा हा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्याच्याकडून फसवणुक झालेल्या लोकांनी दहिसर पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page