मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
28 फेब्रुवारी 2025
मुंबई, – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्ल्याची धमकी देण्यात आली आहे. वाहतूक पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला एक मॅसेज प्राप्त झाला असून धमकीचा हा मॅसेज पाकिस्तानातून आल्याचे तपासात उघडकीस आले आहे. याप्रकरणी वरळी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. या गुन्ह्यांचा स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेचे अधिकारी संमातर तपास करत आहेत.
वरळी येथे वाहतूक पोलिसांचे मुख्य नियंत्रण कक्ष असून या कक्षात नागरिकांच्या तक्रारीचे निवारण केले जाते. त्यासाठी तिथे एक व्हॉटअप क्रमांक ठेवण्यात आला असून या व्हॉटअप क्रमांकावर नागरिक त्यांच्या तक्रारी करतात. मात्र गेल्या काही दिवसांपासून या व्हॉटअप क्रमांकावर राजकीय नेत्यासह विविध बॉलीवूड कलाकारांना धमकीचे मॅसेज पाठविले जात आहे. काही दिवसांपूर्वी सिनेअभिनेता सलमान खानसह माजी आमदार झिशान सिद्धीकी यांनाही धमक्या देण्यात आल्या होत्या. बुधवारी एका अज्ञात व्यक्तीने मुख्य नियंत्रण कक्षाच्या व्हॉटअप क्रमांकावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच धमकी दिली आहे. धमकीच्या मॅसेजमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्ला होणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
प्राथमिक तपासात हा मॅसेज पाकिस्तानातून आल्याचे उघडकीस आले आहे. धमकी देणारा व्यक्ती पाकिस्तानात आहे की त्याने दुसर्या देशातून हा मॅसेज पाठविला याचा आता पोलिसांकडून तपास सुरु आहे. बुधवारी दुपारी सव्वाच्या सुमारास हा मॅसेज आला होता. एका पोलीस हवालदाराला हा मॅसेज दिसला आणि त्याने ही माहिती वरिष्ठ पोलीस अधिकार्यांना दिली होती. या व्यक्तीने स्वतचे नाव मलिक शाहबाज हुमायून राजा देव असल्याचे सांगून तो सीएमओवर हल्ला करणार असल्याची धमकी दिली होती.
या घटनेनंतर वरिष्ठांच्या आदेशावरुन संबंधित पोलीस हवालदाराने वरळी पोलीस ठाण्यात संबंधित व्यक्तीविरुद्ध तक्रार केली आहे. या गुन्ह्यांचा वरळी पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी संमातर तपास करत आहेत. या व्यक्तीची माहिती काढण्याचे काम सुरु असून तो मॅसेज कोणी आणि कोठून पाठविला आहे यासाठी सायबर सेलच्या पोलीस अधिकार्यांची मदत घेतली जात आहे.