मुख्यमंत्री कोट्यातील म्हाडाच्या फ्लॅटच्या नावाने फसवणुक
साडेसतरा लाखांच्या फसवणुकीप्रकरणी पती-पत्नीला अटक
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२२ जुलै २०२४
मुंबई, – मुख्यमंत्री कोट्यातील म्हाडाचा फ्लॅट स्वस्तात देण्याचे आमिष दाखवून एका कुटुंबातील तिघांची सुमारे साडेसतरा लाख रुपयांची फसवणुक केल्याप्रकरणी पती-पत्नीला चारकोप पोलिसांनी अटक केली. राज हिरालाल शहा आणि स्वप्ना राज शहा अशी या दोघांची नावे आहेत. याच गुन्ह्यांत राजला पोलीस कोठडी तर त्याची पत्नी स्वप्ना हिला बोरिवलीतील लोकल कोर्टाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. राज या कटातील मुख्य आरोपी असून त्याने या तिघांसह अनेकांना म्हाडाच्या फ्लॅटच्या नावाने लाखो रुपयांना गंडा घातल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
६३ वर्षांचे वयोवृद्ध तक्रारदार प्रदीपकुमार मोहनलाल सोलंकी हे त्यांच्या पत्नी आणि दोन मुलांसोबत लोअर परेल येथील जी. के मार्ग, गजानन निवास सहकारी सोसायटीत राहत असून ते बीपीटीमधून निवृत्त झाले आहेत. तीन वर्षांपूर्वी प्रदीपकुमार व त्यांचे जावई सिंकदर प्रकाश चव्हाण हे बोरिवली किंवा कांदिवली परिसरात फ्लॅट घेण्यासाठी प्रयत्न करत होते. याच दरम्यान त्यांच्या एका परिचित व्यक्तीने राज शहाची माहिती दिली होती. राज याची म्हाडामध्ये चांगली ओळख असून तो तुम्हाला म्हाडाचे फ्लॅट स्वस्तात देईल असे सांगितले. त्यामुळे ते त्यांच्या जावयासोबत राजच्या कांदिवलीतील चारकोप येथील घरी गेले होते. यावेळी राजने तो मंत्रालयात कामाला असून त्याची म्हाडा कार्यालयात चांगली ओळख आहे. कांदिवलीतील लिंक रोड, महावीरनगरमध्ये म्हाडाच्या इमारतीचे बांधकाम सुरु असून तिथेच त्यांना मुख्यमंत्री कोट्यातून ४७५ स्न्वेअर फुटाचा फ्लॅट देतो असे सांगितले. या रुमची किंमत ३३ लाख रुपये होती. त्याच्यावर विश्वास ठेवून त्यांनी स्वतसह जावई आणि मुलासाठी तीन फ्लॅटबाबत त्याच्याशी सविस्तर चर्चा केली होती. मार्च २०२१ रोजी त्याने त्यांच्या नावाने मुख्यमंत्री कोट्यातील फ्लॅटसाठी मुख्यमंत्री सचिवालय, महाराष्ट्र शासन, मंत्रालय नावाचा स्टॅम्प असलेला फॉर्म भरुन घेतला होता.
काही दिवसांनी त्याने प्रदीपकुमार सोलंकी, जावई सिंकदर चव्हाण आणि मुलगा हेमंत सोलंकी यांच्या नावाने म्हाडाचे अर्ज भरले होते. या अर्जानंतर त्यांना एक लिस्ट दाखविण्यात आली होती. या लिस्टमध्ये या तिघांना कांदिवलीतील महावीरनगरच्या म्हाडा वसाहतीत फ्लॅट अलोट झाल्याचे सांगण्यात आले होते. या लिस्टची पाहणी केल्यानंतर त्या तिघांचे नावे होती. त्यामुळे उर्वरित पैशांसाठी राजने त्यांच्याकडे तगादा लावण्यास सुरुवात केली होती. ठरल्याप्रमाणे प्रदीपकुमार यांनी सात लाख रुपये, हेमंतने साडेपाच लाख आणि सिंकदरने पाच लाख रुपये राजला दिले होते. अशा प्रकारे मुख्यमंत्री कोट्यातील म्हाडा फ्लॅटसाठी त्यांनी त्याला साडेसतरा लाख रुपये दिले होते. याच दरम्यान त्यांना म्हाडा कार्यालयातून एक पत्र प्राप्त झाले होते. त्यात त्यांना म्हाडाचा फ्लॅट अलोट झाला आहे तो नाकारण्यात येत आहे असे नमूद करण्यात आले. त्यामुळे त्यांनी राजकडे विचारणा केली असता त्याने या पत्राकडे दुर्लक्ष करा. तुम्हाला दुसरा फ्लॅट देतो असे सांगितले. मात्र त्याने दिलेल्या मुदतीत म्हाडाचा फ्लॅट दिला नाही. त्यामुळे त्यांनी त्याच्याकडे त्यांच्या पैशांची मागणी सुरु केली होती. यावेळी त्याने त्यांना साडेसतरा लाखांचे धनादेश दिले होते.
मात्र ते धनादेश बँकेत न वटता परत आले होते. याबाबत विचारणा केल्यानंतर तो त्यांना टाळण्याचा प्रयत्न करत होता. याच दरम्यान त्यांना राज शहाने प्रथमेश गोपाल घाडीगावकर, उमेश भैरुनाथकांबळे, अभिनव चंद्रभान विश्वकर्मा, पायल महेश पंदेरे, निलेश भास्कर पावसकर, महेश अशोक गोलांडे यांच्यासह अनेकांना मुख्यमंत्री कोट्यातून म्हाडाचा स्वस्तात फ्लॅट देतो असे सांगून लाखो रुपये घेतले होते. मात्र कोणालाही फ्लॅट न देता त्यांनी दिलेल्या पैशांचा अपहार करुन फसवणुक केली होती. फसवणुकीचा हा प्रकार उघडकीस येताच प्रदीपकुमार सोलंकी यांनी राजविरुद्ध चारकोप पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत तो गेल्या सहा महिन्यांपासून फरार होता, अखेर सहा महिन्यानंतर त्याला अटक करण्यात पोलिसांना यश आले. या गुन्ह्यांत त्याची पत्नी स्वप्ना शहा हिचा सहभाग उघडकीस आला होता. त्यामुळे तिच्यावरही पोलिसांनी अटकेची कारवाई केली होती. अटकेनंतर या दोघांनाही बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी राजला पोलीस कोठडी तर स्वप्नाला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.