मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१३ डिसेंबर २०२४
मुंबई, – दक्षिण मुंबईतील कुलाबा येथील उच्चभू अपार्टमेंटमध्ये राहणार्या एका विदेशात स्थायिक झालेल्या महिलेला पाठलाग करुन तिच्या फ्लॅटचा दरवाजा बंद करुन दरवाज्याबाहेर अश्लील कृत्य करणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. याप्रकरणी कुलाबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच पळून गेलेलया नुरेन मोहम्मद खालिद या २२ वर्षांच्या उत्तर भारतीय तरुणाला पोलिसांनी अटक केली. गोवंडी येथे राहणारा नुरेन हा उत्तरप्रदेशचा रहिवाशी असून तो कपडे शिलाईचे काम करत असल्याचे पोलिसांनी सांगितले. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टात हजर करण्यात आले आहे.
५८ वर्षांची तक्रारदार महिला विदेशात वास्तव्यास असून ती तिथे स्थायिक झाली आहे. काही दिवसांपूर्वी ती तिच्या मैत्रिणीकडे राहण्याासाठी आली होती. तिची मैत्रिण कुलाबा येथील एका उच्चभू अपार्टमेंटमध्ये राहते. बुधवारी दुपारी ती कामानिमित्त बाहेर गेली होती. काही वेळानंतर ती घरी आली होती. यावेळी तिला नुरेन हा तिच्या फ्लॅटच्या बाहेर उभा असल्याचे दिसून आले. त्यामुळे ती प्रचंड घाबरली आणि तिने फ्लॅटचा दरवाजा बंद केला होता.त्यानंतर त्याने तिच्या फ्लॅटची कडी बाहेरुन लावून अश्लील वर्तन केले होते. या प्रकारानंतर तिने घडलेला प्रकार तिच्या मैत्रिणीला सांगितला. त्यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार करण्याचा निर्णय घेतला होता. कुलाबा पोलिसांना हा प्रकार सांगून तिने पळून गेलेल्या तरुणाविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत आरोपीविरुद्ध भारतीय न्याय सहिता कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता.
गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपीचा शोध सुरु केला होता. अपार्टमेंटसह परिसरातील सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरुन पोलिसांनी नुरेनला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत त्यानेच हा गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यानंतर त्याला पोलिसांनी अटक केली. नुरेन हा उत्तरप्रदेशच्या बस्तीचा रहिवाशी आहे. चार महिन्यांपूर्वीच तो मुंबई शहरात नोकरीसाठी आला होता. सध्या तो गोवंडीतील शिवाजीनगर परिसरात राहत होता. तिथेच तो कपडे शिलाईचे काम करत होता. त्याने अशाच प्रकारे इतर काही महिलांचा पाठलाग करुन त्यांना पाहून अश्लील वर्तन केल्याचे बोलले जाते. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची पोलिसांकडून कसून चौकशी सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.