अश्लील व्हिडीओ व्हायरलची धमकी देऊन पैशांची मागणी
कुलाबा येथील घटना; अज्ञात महिलेविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१९ जुलै २०२४
मुंबई, – व्हिडीओ कॉलदरम्यान झालेल्या अश्लील संभाषणासह चाळे करणारे व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकी देऊन एका नामांकित कंपनीच्या वरिष्ठ अधिकार्याला ब्लॅकमेल करुन पैशांची मागणी करण्यात आल्याचा प्रकार कुलाबा परिसरात उघडकीस आला. याप्रकरणी अज्ञात महिलेविरुद्ध कुलाबा पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. या गुन्ह्यांचा सायबर सेल पोलिसांकडून संमातर तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.
४४ वर्षांचे तक्रारदार कुलाबा परिसरात राहत असून विक्रोळीतील एका नामांकित कंपनीत प्रोसेस हेड म्हणून काम करतात. गुरुवारी ११ जुलैला ते त्यांच्या घरी होते. यावेळी त्यांना एका अज्ञात महिलेने फेसबुकवरुन फे्रंड रिक्वेस्ट पाठविली होती. ती फे्रंड रिक्वेस्ट त्यांनी स्विकारली होती. त्यानंतर त्यांच्यात संभाषण सुरु झाले होते. यावेळी तिने त्याचा प्रोफाईल आवडला होता. त्यामुळे तिने मॅसेज पाठवून त्याच्याशी मैत्री करण्याची इच्छा व्यक्त केली होती. यावेळी तिने तिचे नाव अनुराधा पौडवाल असल्याचे सांगितले होते. १३ जुलैला तिने त्याला व्हिडीओ कॉल केला होता. या कॉलदरम्यान तिने तिचे अंगावरील कपडे काढण्यास सुरुवात करुन त्यांच्याशी अश्लील संभाषण सुरु केले होते. काही वेळानंतर तिने त्यांना तसे करण्यास प्रवृत्त केले. हा प्रकार संशयास्पद वाटताच त्याने तो कॉल बंद केला होता. काही वेळानंतर तिने त्यांना त्यांच्यातील रेकॉडिंग केलेला व्हिडीओ पाठविला होता. हा व्हिडीओ सोशल मिडीयावर अपलोड करण्याची धमकी देऊन तिने त्यांना ब्लॅकमेल करुन पैशांची मागणी सुरु केली होती. या प्रकाराने त्यांना प्रचंड धक्का बसला होता. बदनामीसह धमकीला घाबरुन त्यांनी तिला पैसे पाठवून दिले होते.
तरीही ती त्यांच्याकडून आणखीन पैशांची मागणी करत होती. त्यामुळे त्यांनी तिला १ लाख ३९ हजार ५०० रुपये पाठवून दिले होते. ही रक्कम नेहा नारायण सलाखे या महिलेच्या बँक खात्यात ट्रान्स्फर झाल्याचे त्यांना दिसून आले होते. पैसे पाठवून तिच्याकडून त्यांना ब्लॅकमेल करुन धमकीचे सत्र सुरु होते. त्यामुळे त्यांनी घडलेला प्रकार त्यांच्या वडिलांना सांगितला. त्यांच्या वडिलांनी त्यांना पोलिसांत तक्रार करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर त्यांनी कुलाबा पोलिसांना घडलेला प्रकार सांगून अज्ञात महिलेविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात महिलेविरुद्ध ३५१ (२), ३१८ (४) भारतीय न्याय संहिता सहकलम ६६ (ड) व ६६ (सी) आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा पोलिसांकडून तपास सुरु आहे. अज्ञात महिलेने कॉल केलेल्या मोबाईलसह बँक खात्याची माहिती काढून तिच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम सुरु केली आहे.