फ्लॅटसह व्यवसायातील ३० लाखांची कॅश नोकराकडून चोरी

वयोवृद्ध महिलेच्या तक्रारीवरुन नोकराविरुद्ध गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
९ मे २०२४
मंबई, – गोरेगाव येथील फ्लॅट विक्रीतून तसेच व्यवसायातील सुमारे तीस लाखांची कॅश नोकराने चोरी केल्याची घटना कुलाबा परिसरात उघडकीस आली आहे. चेतबहादूर असे या नोकराचे नाव असून त्याच्याविरुद्ध कुलाबा पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे चेतबहादूर हा वयोवृद्ध महिलेच्या घरी दहा वर्षांपासून काम करत असून त्याच्यावर तिचा प्रचंड विश्‍वास होता, त्यामुळे त्याच्याकडून झालेल्या या चोरीने तिला प्रचंड धक्का बसल्याचे बोलले जाते.

ही घटना जानेवारी ते एप्रिल २०२४ या कालावधीत कुलाबा येथील आर्थर बंदर रोड, रेडिओ क्लबजवळील पुरण निवास इमारतीमध्ये घडली. या इमारतीच्या तिसर्‍या मजल्यावरील फ्लॅट क्रमांक दहामध्ये ६२ वर्षांची चुंगशू ऍनी चैन ही महिला गेल्या तीस वर्षांपासून राहते. तिच्याकडे गेल्या दहा वर्षांपासून चेतबहादूर हा नोकर म्हणून कामाला होता. त्यामुळे तिला त्याच्यावर प्रचंड विश्‍वास होता. तिच्या मालकीचे मरिनलाईन्स आणि कुलाबा येथे दोन ब्युटी सलून असून या दोन्ही शॉपचे कामकाज ती स्वत सांभाळत होती. सकाळी नऊ वाजता दुकानात गेल्यानंतर ती सायंकाळी सात वाजता घरी येत होती. त्यामुळे दिवसभर घरी चेतबहादूर राहत होता. जानेवारी महिन्यांत तिने तिच्या गोरेगाव येथील फ्लॅटची विक्री केली होती. या फ्लॅट विक्रीची काही रक्कम तिच्या बँक खात्यात जमा झाली होती तर ४० लाख रुपये तिला कॅश स्वरुपात मिळाले होते. त्यातील दहा लाख रुपये तिने तिच्या कर्मचारी महिलेस घर विकत घेण्यासाठी दिले होते. उर्वरित तीस लाख रुपये तिने कपाटात ठेवले होते. गेल्या काही दिवसांपासून तिला तिच्या घरातील कपाटातून काही पैसे चोरीस जात असल्याचे निदर्शनास आले होते. ७ मेला तिने कपाटात ५० हजार रुपये ठेवले होते. मात्र दुसर्‍या दिवशी तिला २७ हजार रुपये असल्याचे दिसून आले. या चोरीमागे चेतबहादूर असल्याचा संशय व्यक्त करुन तिने कुलाबा पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी चेतबहादूरविरुद्ध ३० लाख २३ हजार रुपयांची चोरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page