35 लाखांच्या चोरीप्रकरणी आठ नोकराविरुद्ध गुन्हा दाखल
एका मॅनेजरसह हाऊसकिपिंग, कुक आदी नोकरांचा समावेश
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
17 जून 2025
मुंबई, – कुलाबा परिसरात राहणार्या एका व्यावसायिकाच्या घरी सुमारे 35 लाखांची चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी या व्यावसायिकाच्या तक्रारीवरुन कुलाबा पोलिसांनी आठही नोकराविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. त्यात एका मॅनेजरसह दोन कुक आणि चार हाऊसकिपिंग कर्मचार्यांचा समावेश आहे. अवधेशकुमार राजेंद्र गुप्ता, पॅट्रीक टिंटस किडो ऊर्फ राजू, दिलीपकुमार खोशी यादव, धर्मेंद्र कुमार, सुधीरकुमार बहादूर महंतो, दिनेश बसदेव राम, ट्युल्सन ए संगमा आणि रितिका कृष्णकांत जोगल अशी या आठजणांची नावे आहेत. एक कर्मचारी सुट्टीवर त्याच्या गावी गेला असून त्याचा शोध सुरु आहे.
प्रदीप सनमत शाह हे 65 वर्षांचे वयोवृद्ध कुलाबा येथील एसबीएस रोड, अॅक्रोपोलीस अपार्टमेंटमध्ये त्यांच्या कुटुंबियांसोबत राहतात. त्यांचा प्रिटींग मशिन बनविण्याचा व्यवसाय असून त्यांचा एक कारखाना कोल्हापूर शहरात आहे. त्यांच्याकडे अवधेश व दिलीपकुमार कुक, प्रॅट्रीक कुत्रा सांभाळणे, धर्मेंद्रकुमार, सुधीर, ट्युल्सन आणि दिनेश राम हे चौघेही हाऊसकिपिंग म्हणून काम करतात. त्यांच्या कामावर जबाबदारी मॅनेजर म्हणून रितिका जोगल याच्यावर असून ती सकाळी साडेआठ वाजता कामावर येते आणि सायंकाळी साडेसहा वाजता घरी जाते. इतर सातही नोकर त्यांच्याच घरी राहत होते.
1 जूनला प्रदीप शाह यांची पत्नी रुपाली हिने कपाटात हिरेजडीत सोन्याची रिंग आणि रोलेक्स कंपनीचा एक घड्याळ ठेवले होते. 4 जूनला प्रदीप आणि रुपाली हे दोघेही लंडन येथे गेले होते. यावेळी त्यांचा घरी त्यांचा मुलगा अरमान आणि इतर सातही नोकर राहत होते. लंडनला जात असल्याने त्यांच्या पत्नीने त्यांचा रुम लॉक करुन चावी लपवून सील करुन ठेवली होती. शुक्रवारी 13 जूनला ते दोघेही लंडन येथून मुंबईत आले होते. त्या दिवशी त्यांनी पूर्ण दिवस आराम केला होता. दुसर्या दिवशी त्यांच्या पत्नीने कपाटाची पाहणी केली असता तिला वीस लाख रुपयांचे हिरेजडीत सोन्याचे रिंग आणि पंधरा लाखाचा रोलेक्स कंपनीचा एक घड्याळ असा सुमारे 35 लाखांचा मुद्देमाल चोरीस गेल्याचे दिसून आले.
तिने कपाटात सर्वत्र रिंग आणि घड्याळाचा शोध घेतला, मात्र तिला ते कुठेच सापडले नाही. त्यामुळे तिने तिच्या मुलाला विचारणा केली होती. यावेळी त्याने तो त्यांच्या फ्लॅटमध्ये आलाच नाही असे सांगितले. याच दरम्यान त्यांचा हाऊसकिपिंगचे काम करणारा नोकर सुधीरकुमार हा सुट्टीवर निघून गेल्याचे त्यांना समजले होते. तो सुट्टीवर जाणार असल्याचे त्याने त्यांना आधीच सांगितले होते. त्यामुळे सुधीरकुमारने त्यांच्या फ्लॅटमध्ये प्रवेश करुन ही चोरी केली असावी असा त्यांचा संशय होता. त्यामुळे त्यांनी कुलाबा पोलिसांना घडलेला प्रकार सांगून सुधीरसह त्यांच्या आठही नोकराविरुद्ध चोरीचा संशय व्यक्त करुन त्यांच्याविरुद्ध तक्रार केली होती.
या तक्रारीनंतर या आठही नोकराविरुद्ध पोलिीसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. सुधीरकुमार वगळता इतर सातही नोकरांची पोलिसांकडून चौकशी करुन जबानी नोंदविण्यात आली आहे. सुधीरकुमारचीही लवकरच पोलिसांकडून चौकशी होणार आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून आठपैकी एका नोकराने ही चोरी केली असावी असा प्राथमिक अंदाज असल्याचे पोलिसांनी सांगितले.