कॉलेजमध्ये प्रवेशासह नोकरीच्या आमिषाने तरुणाची फसवणुक
झारखंडच्या एकाच कुटुबातील तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
29 मार्च 2025
मुंबई, – नवी मुंबईतील एका नामांकित कॉलेजमध्ये डिप्लोमा इन नॉटीकल सायन्समध्ये प्रवेशासह नोकरीच्या आमिषाने एका तरुणाची एका कुटुंबातील तिघांनी फसवणुक केली. याप्रकरणी तिन्ही आरोपीविरुद्ध कांदिवली पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. आदित्यकुमार राधारमण विश्वाखा, राधारमण विश्वाखा आणि सुमीतकुमार अशी या तिघांची नावे असून ते तिघेही झारखंडचे रहिवाशी असल्याचे पोलिसांनी सांगितले. या गुन्ह्यांत या तिघांना पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. गुन्ह्यांच्या तपासकामी कांदिवली पोलिसांची एक टिम लवकरच झारखंडला जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
जॉफीक इम्तियाज अन्सारी हा 21 वर्षांचा तरुण कांदिवलीतील गांधीनगर, केडी कंपाऊंड परिसरात राहतो. तो सध्या शिक्षण घेत असून त्याला डिप्लोमा इन नॉटीकल सायन्समध्ये प्रवेश हवा होता. त्यासाठी त्याचे प्रयत्न सुरु होते. जून 2022 रोजी त्याची आदित्यकुमारशी ओळख झाली होती. त्याने त्याला नवी मुंबईतील टी. एस न्हाशेवा परिसरात एका नामांकित कॉलेजमध्ये प्रवेश देण्याचे आश्वासन दिले होते. इतकेच नव्हे तर शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याला चांगली शासकीय नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखविले होते. त्यानंतर त्याने त्याचे वडिल राधारमण आणि चुलत भाऊ सुमीतकुमारशी त्याची ओळख करुन दिली होती. त्यांच्या मदतीने त्याने त्याला कॉलेजमध्ये प्रवेश देण्याचे आश्वासन दिले होते. त्यासाठी त्यांच्या बँक खात्यात त्याला पाच लाख सोळा हजार रुपये ट्रान्स्फर करण्यास प्रवृत्त केले होते. कॉलेजमध्ये प्रवेशासह नोकरी मिळणार असल्याने त्याने त्याच्या वडिलांसह चुलत भावाच्या बँक खात्यात ही रक्कम ट्रान्स्फर केली होती.
मात्र दिलेल्या मुदतीत त्याने त्याला कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून दिला नाही. विचारणा केल्यानंतर तो त्याला विविध कारण सांगून टाळण्याचा प्रयत्न करत होता. त्यामुळे त्याने त्याच्याकडे कॉलेजमध्ये प्रवेशासाठी दिलेल्या पैशांची मागणी सुरु केली होती. यावेळी त्याने त्याला सहा हजार रुपये परत केले, मात्र उर्वरित पाच लाख दहा हजाराचा परस्पर अपहार करुन त्याची फसवणुक केली होती. हा प्रकार लक्षात येताच जॉफिक अन्सारीने कांदिवली पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी आदित्यकुमार, त्याचे वडिल राधारमण आणि चुलत भाऊ सुमीतकुमार या तिघांविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.