मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२५ ऑगस्ट २०२४
मुंबई, – चेंबूर येथे अनुराग जयस्वाल या कॉलेज तरुणाचा संशयास्पद मृत्यूने एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणी चेंबूर पोलिसांनी एडीआरची नोंद केली आहे. अनुरागने पार्टीत ओव्हरडोस मद्यप्राशन केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून त्याचा अहवाल आल्यानंतर त्याच्या मृत्यूचे अधिकृत समजू शकेल असे पोलिसांकडून सांगण्यात आले. दरम्यान या घटनेची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत चेंबूर पोलिसांना तपासाचे आदेश दिले आहेत.
अनुराग हा मूळचा उत्तरप्रदेशचा रहिवाशी होता. तो टाटा इन्स्ट्यिूट ऑफ सोशल सायन्स इन एचआरच्या पहिल्या वर्षांत शिकत होता. चेंबूरच्या एका अपार्टमेंटमध्ये तो त्याच्या तीन मित्रांसोबत भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहत होता. शनिवारी रात्री उशिरा कॉलेजच्या सिनिअर आणि ज्युनिअर विद्यार्थ्यांची वाशी येथे एका पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीत अनुराग हा त्याच्या मित्रांसोबत गेला होता. तिथे त्याने ओव्हरडोस मद्यप्राशन केले होते. पार्टी संपल्यानंतर रात्री तीन वाजता ते सर्वजण त्यांच्या फ्लॅटमध्ये आले आणि झोपले होते. सकाळी दहा वाजता त्याचे मित्र उठले, त्यांनी अनुरागला उठविण्याचा प्रयत्न केला. मात्र बरेच प्रयत्न करुन तो उठला नाही. त्याची काहीच हालचाल नव्हती. हा प्रकार संशयास्पद वाटताच त्याला त्याच्या मित्रांनी जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेले होते. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. ही माहिती मिळताच चेंबूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी त्याच्या तिन्ही मित्रांची पोलिसांनी चौकशी करुन जबानी नोंदवून घेतली आहे. या चौकशीतून हा प्रकार उघडकीस आला. या घटनेनंतर त्याचा मृतदेह पोलिसांनी शवविच्छेदनासाठी पाठविला होता. त्याचा अहवाल अद्याप पोलिसांना प्राप्त झालेला नाही. मात्र ओव्हरडोस मद्यप्राशन केल्याने त्याचा मृत्यू झाला असावा असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
शवविच्छेदन अहवालानंतर त्याच्या मृत्यूमागील कारणाचा खुलासा होणार आहे. दरम्यान पार्टीत सामिल झालेल्या इतर मित्रांची लवकरच पोलिसाकडून चौकशी होणार आहे. या पार्टीत दारुसोबत ड्रग्जचे सेवन कोणी केले होते का याचा पोलीस तपास करत आहे. दरम्यान अनुरागच्या संशयास्पद मृत्यूची माहिती त्याच्या उत्तरप्रदेशातील कुटुंबियांना देण्यात आली असून ते मुंबईत येण्यासाठी निघाले आहेत. अनुरागच्या मृत्यूने त्याच्या मित्रांसह सहकार्यांमध्ये प्रचंड खळबळ उडाली होती.