मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२० ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – बँकेत तारण ठेवलेल्या व्यावसायिक गाळ्याची परस्पर विक्री करुन एका व्यावसायिक महिलेची सुमारे एक कोटीची फसवणुक केल्याप्रकरणी अनिल जिवराम मिश्रा या आरोपीविरुद्ध काळाचौकी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अनिल हा पळून गेल्याने त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.
४२ वर्षांची तक्रारदार महिला ही घाअकेापर येथे राहते. गेल्या वर्षी तिची अनिल मिश्राशी ओळख झाली होती. अनिलचा मालकीचा शिवडीतील टोकेरसी जिवराज रोड, शिवडी निलगिरी उद्योग भवनमध्ये एक व्यावसायिक गाळा आहे. या गाळ्याची त्याला विक्री करायची होती. तक्रारदार महिला गाळा खरेदीसाठी इच्छुक असल्याने त्यांच्यात गाळ्याचा खरेदी-विक्रीचा एक कोटी एक लाखांमध्ये व्यवहार झाला होता. ठरल्याप्रमाणे मे २०२३ ते जानेवारी २०२४ या कालावधीत तिने अनिलला टप्याटप्याने एक कोटी एक लाख रुपयांचे पेमेंट केले होते. त्यानंतर त्यांच्यात एक कायदेशीर करार झाला होता. गाळ्याचा ताबा मिळाल्यानंतर तिला अनिलने तोच गाळा एका खाजगी बँकेत तारण ठेवून कर्ज घेतल्याचे समजले होते. सुमारे ८० लाखांची कर्जाची परतफेड न करता त्याने तिच्यासोबत गाळ्याचा खरेदी-विक्रीचा व्यवहार करुन तिची फसवणुक केली होती.
हा प्रकार लक्षात येताच तिने अनिल मिश्राकडे गाळ्यासाठी दिलेल्या पैशांची मागणी सुरु केली होती. मात्र वेळोवेळी आश्वासन देऊन त्याने गाळ्याची रक्कम परत केली नाही. त्याच्याकडून पैसे मिळण्याची शक्यता नसल्याने तिने घडलेला प्रकार काळाचौकी पोलिसांना सांगून अनिल मिश्राविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांत त्याला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्याचा पोलिसाकडून शोध सुरु आहे.