मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२ जुलै २०२४
मुंबई, – आर्थिक अडचणीत सापडलेल्या कंपनीत गुंतवणुक केल्यास चांगला परतावा तसेच पार्टनरशीपची ऑफर देत एका डॉक्टरसह त्याच्या भावाची सुमारे ४७ लाखांची फसवणुक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी मुख्य व्यावसायिकासह दोघांविरुद्ध वडाळा टी टी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. बसंत तुकाराम राठोड आणि अशोक खोडेकर अशी या दोघांची नावे असून या दोघांची लवकरच पोलिसांकडून चौकशी होणार आहे.
कृष्णा रामजीत जयस्वाल हे डॉक्टर असून ते विलेपार्ले परिसरात राहतात. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यांत त्यांची बसंत राठोडशी ओळख झाली होती. या ओळखीत त्याने त्याच्या मालकीची विलेपार्ले येथे ए. एम आर प्रोडक्ट इंजिनिअर नावाची एक कंपनी असल्याचे सांगितले होते. सध्या त्याची कंपनी आर्थिक अडचणीत असून त्याला पैशांची गरज आहे. त्यामुळे त्यांनी त्याच्या कंपनीत गुंतवणूक केल्यास त्यांना पार्टनरशीप, कंपनीतून होणार्या फायद्यातून त्यांना ५० टक्के शेअर देण्याचे आश्वासन दिले होते. काही दिवसांनी त्यांनी तो कंपनीचा मालक असल्याने त्याला त्यांना थेट पार्टनर बनविता येणार नाही, त्यामुळे आपण पार्टनरशीपमध्ये नवीन कंपनीची स्थापना करु असे सांगून त्यांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला होता. त्याची ऑफर चांगली वाटल्याने त्यांनी त्याच्यासोबत पार्टनरशीपमध्ये व्यवसाय सुरु करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर त्यांच्यात कायदेशीर एमओयु करण्यात आला होता. ठरल्याप्रमाणे त्याने त्याला जीएसटी भरण्यासाठी, प्रोजेक्टर न करण्यासाठी, गाडी सोडविण्यासाठी तसेच इतर देणी देण्यासाठी त्यांच्यासह त्यांच्या भावाकडून ४७ लाख ७० हजार रुपये घेतले होते. मात्र गुंतवणुकीनंतर त्याने त्यांना कोणताही परवाता दिला नाही. तसेच कंपनीच्या व्यवहाराची कुठलीही माहिती शेअर केली नव्हती.
हा प्रकार संशयास्पद वाटताच त्यांनी त्याच्याकडे पैशांची मागणी सुरु केली होती. मात्र वारंवार पैशांची मागणी करुनही त्याने त्यांची गुंतवणुक केलेली रक्कम परत केली नाही. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच त्यांनी वडाळा टी टी पोलिसात बसंत राठोड आणि त्याचा सहकारी अशोक खोडेकर याच्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्यांच्याविरुद्ध पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. बसंतने पार्टनरशीप ऑफर करुन कंपनीत गुंतवणुकीच्या नावाने इतर काही लोकांची फसवणुक केली आहे का याचा पोलीस तपास करत आहेत.