दोन कोटीच्या फसवणुकीप्रकरणी पाचजणांविरुद्ध गुन्हा दाखल
चांगला परवाता देतो सांगून कंपनीत गुंतवणुक करण्यास प्रवृत्त केले
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१० जुलै २०२४
मुंबई, – चांगला परतावा देतो असे सांगून कंपनीत गुंतवणुक करण्यास प्रवृत्त करुन एका व्यावसायिकाची पाचजणांनी सुमारे दोन कोटीची फसवणुक केली. याप्रकरणी पाचही आरोपीविरुद्ध टिळकनगर पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. लिझी नोवल, विनय थोप्पी, विनित शेट्टी, आनंद रमण आणि कपिल वेलजी पटेल अशी या पाचजणांची नावे असून ते सर्वजण ओडेक्स इंडिया सोल्यूशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे मालक व संचालक असल्याचे पोलिसांनी सांगितले.
रमेश मुरजी पटेल हे व्यावसायिक असून त्यांच्या कुटुंबियांसोबत घाटकोपरच्या राजावाडी, पाम व्हुय अपार्टमेंटमध्ये राहतात. त्यांचा संगणक खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. आठ वर्षांपूर्वी त्यांची पाचही आरोपींशी ओळख झाली होती. या आरोपींची ओडेक्स इंडिया सोल्यूशन प्रायव्हेट लिमिटेड नावाची एक कंपनी असून या कंपनीत ते सर्वजण संचालक म्हणून काम करतात. रमेश पटेलशी ओळख वाढवून त्यांनी त्यांना त्यांच्या कंपनीत गुंतवणुकीचा सल्ला देत गुंतवणुकीवर जास्त परतावा देण्याचे आमिष दाखविले होते. इतकेच नव्हे तर त्यांना कंपनीमध्ये इक्विटी शेअर देण्याचे आश्वासन दिले होते. कंपनीच्या गुंतवणुकीवर अल्पावधीत जास्त परवाता मिळत मिळत असल्याने त्यांनीही त्यांच्याकडे गुंतवणुकीचा निर्णय घेतला होता. ऑक्टोंबर २०१६ ते जून २०२४ या कालावधीत त्यांनी टप्याटप्याने कंपनीत दोन कोटी तीस लाखांची गुंतवणुक केली होती. मात्र या गुंतवणुकीवर त्यांना कुठलाही परतावा न देता या पाचही संचालकांनी त्यांनी दिलेल्या पैशांचा पैशांचा वैयक्तिक फायद्यासाठी वापर केला होता.
हा प्रकार लक्षात येताच रमेश पटेल यांनी त्यांच्याकडे गुंतवणुक केलेल्या पैशांची मागणी सुरु केली होती. सतत पैशांची मागणी होत असल्याने त्यांनी त्यांना तीस लाख रुपये परत केले, मात्र उर्वरित दोन कोटीचा अपहार करुन त्यांची फसवणुक केली होती. या पाचही आरोपींकडून पैसे मिळण्याची शक्यता नसल्याने त्यांनी टिळकनगर पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर लिझी नोवल, विनय थोप्पी, विनित शेट्टी, आनंद रमण आणि कपिल पटेल यांच्याविरुद्ध पोलिसांनी ४०६, ४०९, ४२०, ३४ भादवी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून लवकरच या पाचही संचालकाची पोलिसांकडून चौकशी होणार आहे. या आरोपींनी कंपनीत गुंतवणुकीच्या नावाने इतर काही व्यक्तींची फसवणुक केली आहे का याचाही पोलिसांकडून तपास सुरु आहे.