पोलिसांत तक्रार म्हणून कॉम्प्युटर टिचरवर प्राणघातक हल्ला
हल्ल्यानंतर पळून गेलेल्या २४ वर्षांच्या आरोपीस अटक
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२ एप्रिल २०२४
मुंबई, – विनयभंगाची पोलिसांत तक्रार केल्यानंतर तीन महिने कारागृहात राहावे लागले याचा राग मनात धरुन एका २४ वर्षांच्या तरुणाने त्याच्याच ३० वर्षांच्या कॉम्प्युटर टिचर असलेल्या तरुणीवर लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला केल्याची घटना मालाड परिसरात उघडकीस आली आहे. या हल्ल्यात गंभीररीत्या जखमी झाल्याने तिला जवळच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी हत्येचा प्रयत्नासह विनयभंगाचा गुन्हा दाखल होताच चमन मोहम्मद अरुण इंद्रीसी या २४ वर्षांच्या आरोपी तरुणाला कुरार पोलिसांनी अटक केली आहे. जखमी तरुणीचा चमन मोहम्मद हा विद्यार्थी असून तो तिच्यावर एकतर्फी प्रेम करत होता. तिने लग्नास दिला तसेच तिच्यामुळे त्याला कारागृहात राहावे लागले म्हणून त्याने हा हल्ला केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.
अविवाहीत असलेली ३० वर्षांची शबाना (नावात बदल) ही मालाड येथे तिच्या कुटुंबियांसोबत राहते. याच परिसरात असलेल्या एका कॉम्प्युटर क्लासेसमध्ये ती विद्यार्थ्यांना कॉम्प्युटर शिकवण्याचे काम करते. याच क्लासमध्ये चमन मोहम्मद हा कॉम्प्युटर शिकण्यासाठी येत होता. त्याचे शबानावर एकतर्फी प्रेम होते. त्यामुळे त्याने तिचा मोबाईल क्रमांक मिळवला होता. त्यानंतर तो तिला सतत मॅसेज पाठवत होता. अनेकदा तो तिला आय लव्ह यू, माझ्याशी लग्न करशील का याबाबत विचारणा करत होता. तिने त्याची समजूत काढूनही तो तिला सतत मॅसेज करुन त्रास देत होता. तिचा पाठलाग करत होता. त्यामुळे तिने चमनविरुद्ध कुरार पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. या तक्रारीनंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली होती. जामिनासाठी पैसे नसल्याने त्याला तीन महिने कारागृहात राहावे लागले होते. त्याचा त्याच्या मनात प्रचंड राग होता. त्यामुळे तो तिला भेटण्याची संधीची वाट पाहत होता. शनिवारी ३० मार्चला सकाळी नऊ वाजता शबाना ही क्लासमध्ये जात होती. वेळी दुर्गा इंदिरानगर, माता मंदिराजवळ त्याने तिला थांबविले. तुम मुझसे शादी करोगी या नही असे विचारुन त्याने तिला जिवे मारण्याच्या उद्देशाने लोखंडी रॉडने तिच्या डोक्यावर, हातावर, कमरेवर प्राणघातक हल्ला केला. त्यात शबाना ही गंभीररीत्या जखमी झाली होती. हा प्रकार स्थानिक रहिवाशांच्या निदर्शनास येताच चमन हा तेथून पळून गेला. जखमी झालेल्या शबानाला तातडीने स्थानिक लोकांनी जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. तिथेच तिच्यावर उपचार सुरु करण्यात आले.
ही माहिती मिळताच कुरार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी तिची जबानी नोंदवून पोलिसांनी चमनविरुद्ध ३०७, ३५४ डी भादवी कलमांतर्गत गुन्हा नोंदविला होता. गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या चमनचा पोलिसांनी सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना सीसीटिव्ही फुटेजसह तांत्रिक माहितीवरुन रविवार ३१ मार्चला चमनला पोलिसांनी अटक केली. चौकशीत त्याने तो शबानावर एकतर्फी प्रेम करत होता. मात्र तिच्यामुळे त्याला तीन महिने कारागृहात राहावे लागले होते. त्याचा त्याच्या मनात राग होता. याच रागातून त्याने तिच्यावर प्राणघातक हल्ला केल्याची कबुली दिली. या कबुलीनंतर त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.