गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याच्या आमिषाने फसवणुक
बिल्डरसह दोघांविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
22 मार्च 2025
मुंबई, – कन्स्ट्रक्शन क्षेत्रात गुंतवणुक केल्यास सोळा टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून एकाच कुटुंबातील तिघांची पावणेतीन कोटीची फसवणुक झाल्याचा प्रकार वांद्रे परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी एका बिल्डरसह दोघांविरुद्ध वांद्रे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अनुप शाम करनाणी आणि प्रकाश नारंग अशी या दोघांची नावे आहेत. गुन्हा दाखल झाल्याने या दोघांची लवकरच पोलिसांकडून चौकशी होणार असून त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजाविले जाणार आहे.
51 वर्षांची तक्रारदार गिता शैलेंदर चुगाणी ही महिला व्यापारी असून ती तिच्या कुटुंबियांसोबत राहते. तिचा कपड्याचा व्यवसाय असून या व्यवसाात तिला तिचे कुटुंबिय मदत करतात. तिच्या वडिलांचा प्रकाश नारंग हा मित्र असून तो दलालीचे काम करतो. 2012 रोजी तो त्यांच्या आई-वडिलांच्या वांद्रे येथील घरी आला होता. यावेळी त्याने अनुप करनानी या बिल्डरशी माहिती दिली होती. करणची अनुप करनाणी बिल्डर अॅण्ड डेव्हल्पर नावाची कंपनी आहे. तो लोकांकडून पैसे घेऊन कंन्स्ट्रक्शनमध्ये गुंतवणुक करतो. या गुंतवणुकीवर त्याने अनेकांना सोळा टक्के परतावा दिला आहे. त्यामुळे त्याच्याकडे गुंतवणुक केल्यास त्यांना चांगला फायदा होईल असा सल्ला दिला होता. प्रकाश नारंगवर विश्वास असल्याने तिच्या आई-वडिलांनी अनुप करनाणीकडे गुंतवणुकीचा निर्णय घेतला होता.
गेल्या तेरा वर्षांनी गिता चुगानी हिने अकरा लाख रुपये तिचे वडिल बालू मुलचंदानी यांनी 69 लाख 50 हजार, तिची आई संगीता मुलचंदानी हिने 65 लाख रुपयांची गुंतवणुक केली होती. याबाबत त्यांच्यात एक करार झाला होता. 2012 ते 2019 या कालावधीत त्याने करारानुसार त्यांना सोळा टक्के व्याजाची रक्कम दिली होती, मात्र कोरोनाचे कारण पुढे करुन त्याने व्याजाची रक्कम देणे बंद केले होते. गेल्या सहा वर्षांत त्याच्याकडून त्यांना कुठलीही व्याजाची रक्कम मिळाली नव्हती. वारवांर विचारणा करुनही तो त्यांना पेसे देत नव्हता. विविध कारण सांगून त्यांना टाळण्याचा प्रयत्न करत होता. त्यामुळे त्यांनी त्याच्याकडे त्यांच्या पैशांची मागणी सुरु केली होती. मात्र त्याने पैसे न दिल्याने त्यांनी अनुप आणि प्रकाश नारंग यांच्याविरुद्ध कोर्टात एक याचिका सादर केली होती. या याचिकेवर सुनावणी होऊन कोर्टाने वांद्रे पोलिसांना या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करुन तपासाचे आदेश दिले होते.
या आदेशांनतर गिता चुगानी यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी अनुप करनाणी आणि प्रकाश नारंग यांच्याविरुद्ध अपहारासह फसवणुक तसेच महाराष्ट्र ठेवीदाराच्या अधिनियम कायदा कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या दोघांकडे गिता व तिच्या आई-वडिलांनी 1 कोटी 54 लाख 25 हजाराची गुंतवणुक केली होती. त्यांना व्याजाचे 1 कोटी 17 लाख 65 हजार येणे होते. अशा प्रकारे या दोघांनी त्यांनी दिलेल्या सुमारे पावणेतीन कोटीचा परस्पर अपहार करुन ही फसवणुक केली होती. त्यामुळे या दोघांची लवकरच पोलिसांकडून चौकशी होणार आहे. या चौकशीनंतर त्यांच्यावर अटकेची कारवाई होणार आहे.